सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र राजभवन येथे 'उत्तराखंड राज्य स्थापना दिवस' साजरा


उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान : राज्यपाल रमेश बैस

Posted On: 09 NOV 2023 8:27PM by PIB Mumbai

 

उत्तराखंड ही देवभूमी आहे, तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. या देवभूमीतून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले उत्तराखंडी लोक मृदू स्वभावाचे व मेहनती असून ते महाराष्ट्राच्या भाषा व संस्कृतीशी एकरूप झाले आहेत. महाराष्ट्रातील उत्तराखंडी  समाजाचे राज्याच्या प्रगती व विकासात लक्षणीय योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. 

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे आज (दि. ९) प्रथमच 'उत्तराखंड राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांचा सर्व राज्यांमध्ये स्थापना दिवस साजरा करण्याच्या प्रथेप्रमाणे उत्तराखंड राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन येथे साजरा करण्यात आला.

आद्य शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली उत्तराखंड ही देवभूमी आहे तसेच वीरभूमी देखील आहे. या राज्याने देशाच्या सैन्यदलामध्ये लाखो वीर जवान व अधिकारी दिले आहेत. उत्तराखंडच्या अनेक घरांमध्ये एका मुलाला देशसेवेसाठी लष्करात दाखल करण्याची प्रथा असून या भूमीने जनरल बिपीन रावत यांसारखे महान अधिकारी दिले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला 'एक भारत' दिला. सर्व नागरिकांनी देशाला 'श्रेष्ठ भारत' बनविण्याचा प्रयत्न करावा, असे राज्यपालांनी सांगितले. 

 

यावेळी मुंबईतील उत्तराखंडी समाजाच्या 'गढवाल भ्रातृ मंडल', 'हिमालय पर्वतीय संघ' 'कौथिग  फाउंडेशन' या संस्थांच्या माध्यमातून उत्तराखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. राज्यपाल बैस यांच्या हस्ते तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उत्तराखंडचे मांगल गीत, पूजा नृत्य, कुमाऊनी झोडा नृत्य, लोकगीत, जौनसारी लोकनृत्य, एकल नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना उपस्थित होते.

सुरुवातीला राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले.

***

स्रोत : राजभवन जनसंपर्क

N.Meshram/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976001) Visitor Counter : 93


Read this release in: English