वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून फोंडा येथे एक आठवडाभर हस्तकला प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन
Posted On:
06 NOV 2023 3:43PM by PIB Mumbai
पणजी | 6 नोव्हेंबर 2023
29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गोव्यातील फोंडा, येथे भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे विकास आयुक्त(हस्तकला),यांच्या कार्यालयातर्फे आठवडाभर चालणारेे वस्त्रोद्योग प्रदर्शन आणि विक्री याचे आयोजन करण्यात आले होते.
हस्तकला प्रात्यक्षिके आणि जनजागृती कार्यक्रम योजनेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आणि भारतातील स्वदेशी हस्तकलेच्या समृद्धीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हस्तकला सेवा केंद्र, पणजी यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले होते.
25 स्थानिक कारागिरांनी हे प्रदर्शन आणि विक्री यामध्ये उत्साहपूर्ण सहभाग घेतला ;ज्यांत हाताने केलेले भरतकाम, क्रोशाच्या लेसेस, तागाची उत्पादने, टेराकोटा वस्तू, दागिने, कुणबी हातमाग साड्या इत्यादींसह हस्तकला उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे प्रदर्शन मांडले होते. आठवडाभर चाललेल्या या प्रदर्शनाला स्थानिक तसेच पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सहभाग घेणाऱ्यांकडून रोज सरासरी अंदाजे 8,000 रुपयांची विक्री नोंदवली गेली.
4 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी या कार्यक्रमाचा समारोप सोहळा पार पडला; ज्यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले आणि कारागिरांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचा समारंभ झाला. कार्यक्रमात अनेक मान्यवर पाहुण्यांचा समावेश होता ज्यात क्लस्टर फोंडाच्या अध्यक्षा डॉ. गौरी शिरोडकर,व्हीव्हो.शिरोडाच्या अध्यक्षा श्रीमती संगीता बल्कियर आणि, सहाय्यक संचालक, हस्तकला सेवा केंद्र, पणजी श्रीमती राजेश्वरी के एम.यांचा समावेश होता.
स्थानिक कारागिरांची प्रतिभा प्रकट करण्यासाठी आणि विक्रीला चालना देण्यासाठी विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाने घेतलेल्या प्रयत्नांची, डॉ. शिरोडकर यांनी समारोप समारंभात बोलताना प्रशंसा केली. भारतीय हस्तकलेचा वारसा जपण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असेही त्या म्हणाल्या.
आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमाने स्थानिक कारागिरांना व्यासपीठ आणि उपजीविकेसाठी आधार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाने भविष्यात प्रदर्शन आणि विक्री या योजनेअंतर्गत देशभरात अशी अनेक प्रदर्शने आयोजित करण्याची योजना आखली आहे.
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975050)
Visitor Counter : 88