सांस्कृतिक मंत्रालय
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्र प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा
Posted On:
02 NOV 2023 7:57PM by PIB Mumbai
एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी दिनांक १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी छत्तीसगड येथील चित्रोत्पला लोककला परिषद तसेच आंध्र प्रदेशातील तेलुगु कला समिती यांच्या वतीने तिन्ही राज्यांच्या लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण देशाला समान संस्कृतीच्या धाग्याने जोडण्याच्या उद्देशाने देशाच्या वेगवेगळ्या दिशांना चार मठांची स्थापना केली. धर्माचे अधिष्ठान दिल्यास लोक एका भागातून दुसऱ्या भागात पर्यटनाला जातील व त्यातून त्यांना नव्या संस्कृतीची ओळख होईल, या उद्देशाने त्यांनी पीठांची स्थापना केली, असे नमूद करुन 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा उपक्रम देखील प्रत्येक राज्याने इतर राज्याची संस्कृती जाणून घ्यावी, या हेतूने सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील सर्व राजभवनांमध्ये १ नोव्हेंबरला या एकाच दिवशी ८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिन साजरे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राजभवन येथे हरियाणा , कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू तसेच पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस देखील बुधवारी दि. १ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
छत्तीसगड राज्य स्थापनेसाठी आपण स्वतः आग्रही होतो. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम करीत असतानाच त्यांनी छत्तीसगड राज्य स्थापनेची घोषणा केली, याचे स्मरण देऊन महाराष्ट्राचा राज्यपाल या नात्याने राजभवनात छत्तीसगड स्थापना दिवस साजरा करणे आपल्यासाठी सुखद अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कलाकारांचे अभिनंदन करताना संगीत आणि नृत्य हे भाषा, जात तसेच धर्माच्या सीमा ओलांडून थेट हृदयाला स्पर्श करतात असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ तेलुगू अभिनेते सुमन तलवार, चित्रोत्पला लोक कला परिषदेचे संचालक राकेश तिवारी, तेलुगू कला समितीचे एम.के. रेड्डी आणि कुचीपुडी नृत्यांगना नादिया यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या माध्यमातून चित्रोत्पला लोककला परिषदेच्या वतीने छत्तीसगढ गीत, जंवारा गीत, करमा नृत्य, नाचा गीत नृत्य, फाग गीत नृत्य व मध्य प्रदेशातील कलाकारांचे कबीर गायन (माळवा शैली) सादर करण्यात आले. तेलुगु कला समितीच्या माध्यमातून नृत्यांगना नादिया यांनी कुचीपुडी नृत्य सादर केले.
कार्यक्रमाला राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल व राजभवन परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्र प्रदेश येथील कलाकार व निमंत्रित उपस्थित होते.
***
Press note Raj bhavan/NM/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974263)
Visitor Counter : 99