गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत राजभवनात पाच राज्यांसह पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस उत्साहात साजरा


डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजभवन येथे उत्कृष्ट सांस्कृतिक प्रदर्शन

Posted On: 01 NOV 2023 4:13PM by PIB Mumbai

मुंबई, 1 नोव्‍हेंबर 2023

 

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या पाच राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.

  

'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमा अंतर्गत विविध राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) साजरे  करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार अनू मलिक, राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच निमंत्रित उपस्थित होते.

'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमामुळे विविध राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंस्कृती, लोक संगीत व लोककला याबाबत माहिती मिळते. देशातील सर्व राजभवनांमध्ये इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला पुष्टी मिळत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

आदि शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन करुन देशाला सांस्कृतिक एकात्मतेने जोडले, असे नमूद करून आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश एकात्म भावनेने जोडला गेला आहे, याचे श्रेय आदि शंकराचार्य यांच्या द्रष्टेपणाला जाते, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कमी वेळात विविध राज्यांची लोकगीते व नृत्ये शिकून राजभवन येथे सादर केल्याबद्दल राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व प्रमाणपत्रे देऊन गौरवीत केले.

  

श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांच्या विद्यार्थिनींनी हरियाणा, पंजाब (गिद्धा लोकनृत्य), केरळ (मोहिनीअट्टम), तामिळनाडू (कारगट्टम) व कर्नाटक येथील लोकनृत्य सादर केले; तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी भांगडा, कोलकली नृत्य (लक्षद्वीप) व पुडुचेरीचे गरादी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

   

 

* * *

(Source: Raj Bhavan) | PIB Mumbai | NM/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973782) Visitor Counter : 136
Read this release in: English