संरक्षण मंत्रालय
आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनने पुण्यामध्ये आयोजित केला अभिव्यक्ती-3 साहित्य महोत्सव
Posted On:
27 OCT 2023 9:29PM by PIB Mumbai
पुणे, 27 ऑक्टोबर 2023
आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशन (आवा ), या लष्करी अधिकारी आणि जवानांच्या पत्नींच्या संघटनेने पुण्यामध्ये राजेंद्र सिंहजी संस्थेत अभिव्यक्ती-3, या तिसर्या साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. 'आवा' च्या अध्यक्ष अर्चना पांडे यांनी आज या महोत्सवाचे उद्घाटन केले. यंदाचा महोत्सव दक्षिण कमांडच्या प्रतिभावान महिलांनी आयोजित केला असून, 'आवा' च्या प्रादेशिक अध्यक्षा सुबीना अरोरा त्यांचे नेतृत्व करत आहेत.
अभिव्यक्ती- 3 हा साहित्य महोत्सव , 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, सर्व साहित्य रसिक आणि निमंत्रितांच्या हृदयाला आणि मनाला भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे.
नवी दिल्ली येथील 'आवा' च्या केंद्रीय संघटनेने 2021 मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली होती. भारतीय लष्करी अधिकारी आणि जवानांच्या पत्नींच्या साहित्य अभिव्यक्तीला वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने 'लिटफेस्ट सीझन -1' नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या अभिनव उपक्रमाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सीझन -1 ला लाभलेल्या यशाने प्रोत्साहित होऊन, मागील वर्षी जयपूर येथे लिट-फेस्टचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला.
या वर्षीच्या लिटररी फेस्टिव्हलसाठी ठरवलेली संकल्पना आहे, ‘संक्रमण, क्षणभंगुरता आणि परिवर्तन’. आवा च्या , ‘परिवर्तनाच्या मार्गावर’, या संकल्पनेशी ती सुसंगत आहे. ही संकल्पना निवडण्यामागे, लोकांना कथेमधील कल्पनेचा प्रवास घडवणे, आणि त्यानंतर मोठ्या परिघात अशा त्या कल्पनांचा विस्तार करून, त्यावरील चर्चेला प्रोत्साहन देणे, हे उद्दिष्ट आहे.
या लिट-फेस्टच्या माध्यमातून नवोदित आणि अनुभवी लेखक, कवी, ब्लॉगर्स, सृजनशील लेखक आणि प्रकाशकांच्या मोठ्या समुदायाला एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी रोचक संभाषण, पॅनेल चर्चा, आणि साहित्य विषयक कार्यशाळा आयोजित केल्या जातील, जिथे प्रत्येकाला आपल्या कल्पना मांडण्यासाठी आणि विचार करण्यासाठी भरपूर अवकाश मिळेल. लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या बहुआयामी कौशल्यांचे आणि प्रतिभेचे भव्य प्रदर्शन उद्योजकीय प्रदर्शनाच्या रूपात आयोजित केले जाईल. आवा च्या आशा, विश्वास आणि आस्था या उद्दिष्टाशी ते सुसंगत असेल.
'आवा' प्रादेशिक अध्यक्षा सुबीना अरोरा आणि दक्षिण स्टार आवा महिलांनी लिट-फेस्ट चा तिसरा सीझन यशस्वी करण्यात घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्यांनी दिलेले योगदान, याचा विशेष उल्लेख करत, आवा अध्यक्ष अर्चना पांडे यांनी त्यांची प्रशंसा केली. प्रसिद्ध लेखक, सेलिब्रिटी पाहुणे आणि पॅनेलच्या सदस्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी फलदायी संवाद साधण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली. अभिव्यक्ती सीझन 3 खऱ्या अर्थाने लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींमध्ये साहित्याप्रती रुची वाढवण्यासाठी आणि त्यांच्या साहित्य अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जश्न-ए-कलाम आणि बीट बाय बीट यांसारख्या राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झालेल्या नाट्य कला पथकांच्या नाट्य आणि लोककला सादरीकरणासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या लिट-फेस्टचे अभिरुची मूल्य वृद्धिंगत केले आहे.
M.Iyengar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972260)
Visitor Counter : 87