माहिती आणि प्रसारण मंत्रालय

एनएफडीसी-एनएफएआयने 4K स्वरुपात आणलेला ‘आघात’ चित्रपट पाहण्याची संधी


‘आघात’ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन, दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक भरत गोपी यांना आदरांजली

Posted On: 27 OCT 2023 5:12PM by PIB Mumbai

मुंबई, 28 ऑक्टोबर 2023


राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने विशेष प्रयत्न करून 4K स्वरुपात रुपांतरीत केलेला आघात (1985) हा चित्रपट पाहण्याची संधी मुंबईतील चित्रपट प्रेक्षकांना मिळणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते व्ही. गोपीनाथन नायर अर्थात भरत गोपी यांच्या 86 व्या जयंतीचे औचित्य साधून एनएफडीसी-एनएफएआयच्या वतीने ‘आघात’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई ॲकेडमी ऑफ मुव्हींग इमेज (MAMI) मार्फत आयोजित जिओ मामी मुंबई चित्रपट महोत्सवात शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी मालाड येथील आयनॉक्स इनॉर्बिट मॉल येथे दुपारी 2 वाजता हा चित्रपट दाखवण्यात येईल.

तसेच भरत गोपी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या 2 नोव्हेंबर रोजी अंधेरीतील पीव्हीआर आयकॉन इन्फिनिटी मॉल येथे दाखवण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये दोन व्यापारी समूहांमधील सत्तास्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यावर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात भरत गोपी यांच्यासह ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, सदाशिव अमरापूरकर, अमरीश पुरी, अच्युत पोतदार, पंकज कपूर, रोहिणी हट्टंगडी, दीपा साही, के. के. रैना आणि एम. के. रैना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनय केलेला आहे.

यंदाच्या मामी मुंबई चित्रपट महोत्सवात हा चित्रपट ‘भरत गोपी यांचे चित्रपट’ या उपक्रमाअंतर्गत दाखवण्यात येत आहे. भरत गोपी यांना भारतीय चित्रपट इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या चित्रपटांचा वारसा हा अतिशय मोठा असून यंदाच्या काळातील अभिनेते, चित्रपट निर्माते यांच्यासह प्रेक्षकांसाठीही तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपल्या कारकिर्दित भरत गोपी यांनी मणि कौल, जी. अरविंदन, अदूर गोपालकृष्णन, गोविंद निहलानी आणि के. जी. जॉर्ज यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शक-निर्मात्यांसोबत काम केलं. मात्र त्यामध्ये केवळ दोन हिंदी चित्रपटांमध्येच ते दिसले. ‘आघात’ हा चित्रपट हा त्यापैकीच एक.

या बाबी विचारात घेऊन एनएफडीसी-एनएफएआयने भरत गोपी अभिनित ‘आघात’ चित्रपट हा सध्याच्या काळात लोकप्रिय असलेल्या 4K या आधुनिक स्वरुपात आणला आहे.

एनएफडीसी-एनएफएआय या संस्था केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या भारतीय चित्रपट वारसा मोहीम (एनएफएचएम) या उपक्रमाअंतर्गत 2015 पासून भारतीय चित्रपट सृष्टीतील वारशाचे जतन, संवर्धन आणि त्याला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे. या मोहिमेत दिग्गज दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांचाही सहभाग होता. जुन्या चित्रपटांना नव्या 4K स्वरुपात आणण्यासाठी एनएफडीसी-एनएफएआयने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

आघात चित्रपटासोबतच एनएफडीसीने संग्रहित केलेल्या एलिप्पथायम, कोडियेत्ताम आणि चिदंबरम या चित्रपटांचे विशेष शोही जिओ मामी चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत या चित्रपटांची वेळ आणि ठिकाण यांच्याबाबत अधिक माहितीसाठी https://www.mumbaifilmfestival.com या संकेतस्थळावर भेट द्यावी.


H.Akude/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972055) Visitor Counter : 90


Read this release in: English