सांस्कृतिक मंत्रालय
'मेरी माटी, मेरा देश' अभियानांतर्गत मुंबईत राज्यस्तरीय ‘अमृत कलश यात्रा’ सोहळ्याचे आयोजन
Posted On:
27 OCT 2023 4:21PM by PIB Mumbai
मुंबई, 27 ऑक्टोबर 2023
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे 'मेरी माटी, मेरा देश' अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण भारताच्या ग्रामीण भागातील 6 लाख खेड्यांमधून आणि शहरी भागातील प्रभागांमधून माती आणि तांदूळ हे धान्य गोळा केले जात आहे. या अभियानांतर्गतच आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून संकलित करण्यात आलेल्या पवित्र मातीचा ‘अमृत कलश यात्रेचा’ राज्यस्तरीय सोहळा मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे साजरा करण्यात आला. या अमृत कलश यात्रेसाठी राज्यातील घराघरातून मातीचे संकलन करण्यात आले असून एकूण 900 स्वयंसेवक हे सुमारे 414 मातीचे कलश घेऊन मुंबईत दाखल झाले. या राज्यस्तरीय अमृत कलश यात्रा सोहळ्याच्या समारोपानंतर हे सर्व स्वयंसेवक अमृत कलश घेऊन मुंबई सेंट्रल येथून आज विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना होतील. 31 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील हे स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या राज्यस्तरीय अमृत कलश यात्रेचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि एकात्मतेची भावना वाढवून देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आहे अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अमृत कलशाचे पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राने दर्शवलेला सहभाग हा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्राचे संचालक प्रकाश मनुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपीय पर्वनिमित्त 'मेरी माटी, मेरा देश' अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अमृत कलश यात्रा या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

तत्पूर्वी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.
“मेरी माटी मेरा देश” विषयी :
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या ‘वीरांना’ आदरांजली अर्पण करण्यासाठी 9 ऑगस्ट 2023 रोजी “मेरी माटी मेरा देश” हे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य सैनिक आणि सुरक्षा दलांसाठी समर्पित शीला फलक, पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, विरों का वंदन यासारखे शूर वीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाला वंदन करणारे उपक्रमही राबवण्यात आले.
ग्रामीण भागात ते प्रभाग स्तरावर एकत्र करून प्रभाग-स्तरीय कलश तयार केला जाईल. प्रत्येक राज्याच्या राजधानी मधून हे कलश राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यक्रमासाठी समारंभपूर्वक पाठवले जातील. शहरी भागात, प्रभाग स्तरावर माती गोळा करून मोठ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र करून राज्याच्या राजधानीमधून नवी दिल्ली येथे पाठवली जात आहे. ऑक्टोबर अखेरी पर्यंत 8500 पेक्षा जास्त कलश राजधानी दिल्ली येथे प्रमुख कार्यक्रमासाठी पोहोचतील असा अंदाज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण जागी ठेवण्यासाठी, भारताच्या कानाकोपऱ्यातून गोळा केलेली माती अमृत वाटिका आणि अमृत स्मारकाच्या परिसरात पसरली जाईल.
S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971996)
Visitor Counter : 183