अर्थ मंत्रालय

मुंबईमध्ये केलेल्या विविध कारवायांच्या माध्यमातून महसूल गुप्तचर संचालनालयाने केले  7 किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त

Posted On: 17 OCT 2023 8:23PM by PIB Mumbai

 

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीकडून गुन्ह्यांसाठी विविध क्लृप्त्यांचा अवलंब करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे अनेक प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने उघडकीला आणले आहेत.

अंमली पदार्थांच्या तस्करीच्या एका प्रकरणात दिल्ली विमानतळाच्या माध्यमातून नैरोबीहून आणलेले अंमली पदार्थ विरार येथील एका भारतीय नागरिकाकडून हस्तगत करण्यात आले.

गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या 4 प्रकरणांपैकी दोन प्रकरणात लागोपाठ केलेल्या कारवायांमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने दोन व्यक्तींना त्यांच्या ट्रॉली बॅगांच्या छुप्या पोकळ्यांमध्ये अंमली पदार्थ लपवून आणण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले. 

इतर दोन प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांच्या वाहकांनी या पदार्थांनी भरलेल्या कॅप्सूल गिळल्या होत्या आणि त्यांच्या पोटातून या कॅप्सूल बाहेर काढण्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करावे लागले.

या कारवायांमध्ये अवैध बाजारात अंदाजे 70 कोटी रुपये मूल्य असलेले एकूण सुमारे सात किलो कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये 4 व्यक्तींना( 3 पुरुष आणि 1 महिला)  अटक करण्यात आली असून त्यापैकी दोन पुरुष भारतीय आहेत आणि उर्वरित दोन परदेशी नागरिक आहेत.

एका प्रकरणात डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जिवंत काडतुसांसह विना परवाना बाळगण्यात आलेली बंदूक जप्त केली. जप्त केलेले शस्त्र पुढील तपासाकरिता स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

अंमली पदार्थांच्या विळख्यापासून समाजाला सुरक्षित राखण्यासाठी अंमली पदार्थांच्या तस्करांच्या टोळ्यांकडून तस्करीसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा शोध घेऊन त्यांचे प्रयत्न हाणून पाडत कायद्याची अंमलबजावणी करणारी एक संस्था म्हणून डीआरआयची अविचल समर्पित वृत्ती आणि व्यावसायिकता, एकापाठोपाठ एक केलेल्या या कारवायांमधून  अधोरेखित होत आहे.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968601) Visitor Counter : 103


Read this release in: English