अर्थ मंत्रालय
देशभरातील कारवाईत डीआरआयने सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश
Posted On:
15 OCT 2023 3:02PM by PIB Mumbai
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जमीन आणि रेल्वे मार्गांद्वारे परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला.
13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या ठिकाणी डीआरआयच्या पथकाचा समावेश असलेल्या आणि अतिशय काळजीपूर्वक,नियोजित आणि सुव्यवस्थितपणे केल्या गेलेल्या या कारवाईत 31.7 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत सुमारे 19 कोटी रुपये आहे.
विशिष्ट गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित कारवाई करून, नागपूर डीआरआयच्या पथकाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन जणांना कोलकाताहून निघालेल्या रेल्वेमधून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताना पकडले. त्यांच्याकडून 8.5 किलो वजनाचे विदेशी चिन्हांकित सोने जप्त करण्यात आले. या तस्करांच्या चौकशीनंतर डीआरआयच्या पथकाने तस्करीच्या सोन्याच्या दोन खरेदीदारांची ओळख पटवून त्यांना सुद्धा ताब्यात घेतले.
वाराणसी येथील डीआरआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रस्त्यावर 3 तासांच्या नाट्यमय पाठलागानंतर आणि जंगलातील शोध मोहिमेनंतर वाहनासह दोन आरोपी पकडण्यात यश मिळविले. त्या दोघांकडून आणि कारच्या हँडब्रेकच्या खाली बनवलेल्या पोकळीतून सुमारे 18.2 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
आणखी एका कारवाईत वाराणसीहून रेल्वेने सोने घेऊन गेलेल्या पाच आरोपींना शोधण्यात मुंबईच्या पथकाला यश आले. या पथकाने त्यांच्याकडून 4.9 किलोग्रॅम सोने जप्त केले.
या आरोपींच्या चौकशीत असे उघड झाले की, ही टोळी बांगलादेशच्या सीमेवरून भारतात सोन्याची तस्करी करत असे आणि पुढे ते मुंबई, नागपूर, वाराणसी शहरांकडे ते सोने विक्रीसाठी पाठवले जायचे. योग्य परिश्रम आणि समन्वित कारवाईच्या योजनेसह, डीआरआयने मुंबईत पाच, वाराणसीत दोन आणि नागपुरमध्ये चार अशा एकूण 11 जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेले लोक सोन्याच्या तस्करी करणाऱ्या टोळीच्या सर्व स्तरावरील म्हणजे वाहक/प्रवासी, हँडलर आणि तस्करीच्या सोन्याचे अंतिम प्राप्तकर्ते अशा सर्व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत.
देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या टोळीचा शोध लावण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची डीआरआयची सातत्यपूर्ण क्षमता या कारवाई द्वारे सिद्ध होते. संपूर्ण भारतातील अशा कारवाई मध्ये विविध तपास यंत्रणांचे आपसातील सहकार्य सुद्धा अधोरेखित झाले आहे.
***
G.Chippalkatti/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967922)
Visitor Counter : 127