युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सज्जतेचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आढावा
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम सज्ज : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
Posted On:
11 OCT 2023 6:45PM by PIB Mumbai
पणजी, 11 ऑक्टोबर 2023
गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोव्याचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय शिष्टमंडळाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (एसपीएम) इनडोअर स्टेडिअमला भेट दिली.
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांदरम्यान डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअम येथे तीन क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार आहे. येथे 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत बॅडमिंटन, 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत तलवारबाजी आणि 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इथल्या तयारीसंदर्भात तयारीवर समाधान व्यक्त केले. "डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमच्या सुसज्जतेसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 च्या शानदार यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी स्टेडिअम सुसज्ज झाले आहे," असे सावंत यांनी सांगितले.
गोव्यात होणाऱ्या आगामी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा देशभरातील क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींसाठी संस्मरणीय ठरणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सरकार आणि आयोजन समितीची वचनबद्धता आज घेण्यात आलेल्या सर्वांगीण आढाव्यातून व्यक्त होते.
यावेळी गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग, सचिव (क्रीडा) आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या(एनजीओसी) मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचान, एनजीओसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गोवा क्रीडा प्राधिकरणच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता एस नागवेकर यांच्यासह राष्ट्रीय खेळ तांत्रिक आचार समितीचे अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारी सदस्य अमिताभ शर्मा आणि गोवा सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा :
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 ही प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा असून संपूर्ण देशभरातील खेळाडूंना आणि एकतेला चालना देणे, हा या स्पर्धांचा उद्देश आहे. यात 43 क्रीडा प्रकार असून 28 भारतीय राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि सेवांमधील 10,000 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गोव्यात 28 ठिकाणी होणार आहेत.
N.Chitale/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1966784)
Visitor Counter : 941