माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांनी भरड धान्य महोत्सवाचे केले उद्‌घाटन

Posted On: 04 OCT 2023 6:52PM by PIB Mumbai

पणजी, 4 ऑक्टोबर 2023

पोषण,शाश्वत शेती आणि सामुदायिक कल्याण या उद्देशाला चालना देण्यासाठी गोवा कृषी संचालनालयाने आज गोव्यातील राजभवनातील दरबार हॉल येथे भरड धान्य महोत्सवाचे  आयोजन केले होते. गोव्याचे कृषी मंत्री रवी एस. नाईक यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. भरड धान्याचे उत्पादन आणि वापराविषयी जागरुकता वाढवणे, भरड धान्याचे अलौकिक  पोषणविषयक  फायदे आणि आपल्या दैनंदिन आहारात भरड धान्याचा विविधांगी वापर यावर भर देणे, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात गोव्याच्या केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी) द्वारे एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

भरड धान्य महोत्सवातील केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनात भरड धान्याच्या परिवर्तनीय क्षमतेचे प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे महत्त्व विशद करण्यात आले. भरड धान्य आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते यावर प्रकाश टाकणारी वस्तुस्थिती  आणि आकडेवारी देखील येथे प्रदर्शित करण्यात आली होती. अभ्यागतांनी भरड धान्याचे पौष्टिक फायदे आणि विविध उपयोग लक्षपूर्वक जाणून घेतले. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानावर याचा खोल परिणाम उलगडून दाखवणारा सेल्फी बूथ हे देखील या प्रदर्शनाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य होते.

या महोत्सवात भरड धान्य लागवडीच्या विविध पैलू, त्यांचे पौष्टिक मूल्य, गुणवत्तेचे मापदंड, भरड धान्य आधारित खाद्यपदार्थांसाठी आवश्यक परवाने आणि भरड धान्य वापरून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे यासंबंधात ज्ञानवर्धक चर्चा आणि प्रात्यक्षिकांची मालिका याद्वारे माहिती देण्यात आली. या उत्सवात पाककलेचा उत्साह वाढवणारी भरड धान्य पाक कृती  स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या पाककला स्पर्धेने भरड धान्य आधारित पदार्थांसह त्यांचे पाककलेचे कौशल्य आणि नाविन्य  यांनी आकर्षित केले होते.

ज्ञानार्जन सत्रांनंतर उपस्थितांना भरड धान्य आधारित खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. हे सर्व पदार्थ विविध बचत गट आणि नवोन्मेषी भरड धान्य स्टार्टअप्सद्वारे मोठ्या कुशलतेने तयार करण्यात आले होते. या उत्सवात आकर्षक भरड धान्यावर आधारित मनोरंजन नाटिका आणि समुह गीते देखील सादर करण्यात आली. "भरड धान्य उत्पादन करा, भरड धान्य खा, निरोगी रहा" ही या सर्व कलाविष्कारांची मुख्य संकल्पना होती.

भरड धान्य उत्सवात कला आणि संस्कृती, शिक्षण, उच्च शिक्षण, क्रीडा, अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पर्यटन, महिला आणि बालविकास, आरोग्य आणि गोवा कृषी महाविद्यालय यासह राज्य सरकारच्या विविध विभागांनी सहभाग नोंदवला. या सर्व विभागांच्या सहभागाने समुदाय आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी परस्पर सहकार्याची वचनबद्धता अधोरेखित झाली.

भरड धान्य उत्सव हा गोवा सरकारच्या आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत भविष्याला चालना देण्याच्या समर्पणाचा आणि वर्धित पोषण आणि पर्यावरणीय संवेदनशीलता या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात भरड धान्य केंद्रस्थानी आहे याचा दाखला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार अ‍ॅना रॉय आणि गोवा सरकारच्या कृषी संचालनालयाचे संचालक नेव्हिल अल्फोन्सो उपस्थित होते. ऑक्‍टोबर महिन्यात भरड धान्याच्या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1964295) Visitor Counter : 164


Read this release in: English