माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छता मोहिमेचे रूपांतर शाश्वत लोकचळवळीत करण्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले आवाहन


'एक तारीख एक तास एक साथ': केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

Posted On: 01 OCT 2023 5:13PM by PIB Mumbai

 

'स्वच्छता हीच सेवा या मोहिमे'चा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक तारीख एक तास एक साथ' या  श्रमदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्रातील केंद्रीय संचार ब्यूरो (सी बी सी)) च्या विविध क्षेत्रीय कार्यालयांनी एकत्र येऊन स्वच्छतापूर्तीच्या दिशेने पाऊल पुढे टाकले. स्वच्छता आणि पर्यावरणविषयक जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांच्या सहभागाने प्रत्येकी एक तास चालणाऱ्या या  स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते.  या मोहिमेमध्ये विविध मान्यवरांचाही सहभाग होता. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधील उपक्रमांचे नेतृत्व केले.

सी बी सी च्या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये बोलताना डॉ. भागवत कराड यांनी पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरून या उदात्त कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सहभागींचे कौतुक केले. माणसाचे  आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल, तर दररोज 2 तास परिसर स्वच्छ करणे हा एक चांगला मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेचे रूपांतर चिरंतन लोकचळवळीत करण्याचे आवाहन त्यांनी केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लेणी इथे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठीसंभाजीनगर प्लॉगर्स हा सकाळी धावण्याचा व्यायाम करता करताच कचराही गोळा करणाऱ्यांचा गट, नेहरू युवा केंद्र संघटना (एन वाय के एस), राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ए एस आय) ची स्थानिक शाखा एकत्र आले होते. सोलापुरात केंद्रीय संचार ब्युरोसह पुरातत्व विभाग, नगर परिषद, महिला बचत गट पर्यटन जागृती समिती आणि इतरांनी नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुज परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वर्ध्यात धाम नदीजवळील आचार्य विनोबा भावे आश्रमाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय संप्रेषण ब्युरो वर्धा , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद वर्धा आणि इतर संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. खासदार रामदास तडस आणि विधान परिषद सदस्य पंकज भोईर यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय संचार ब्युरो नाशिकच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील पिपलाड गावात एक तास श्रमदानात केले. या उपक्रमात वालदेवी धरण परिसर आणि जवळच्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. गावच्या सरपंच अलका जोबड आणि इतर मान्यवरांनी या उपक्रमात उपस्थिती नोंदवत स्वच्छतेसाठी समाजाची बांधिलकी अधोरेखित केली.

नागपुरात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट, नागपूर महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब ऑफ नागपूर यांच्या सहकार्याने केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय कार्यालयाने गांधीसागर तलाव परिसर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्ससह सुमारे 500 विद्यार्थ्यांनी बागेचा परिसर, पदपथ आणि मूर्ती विसर्जनाची ठिकाणे स्वच्छ करण्यात सक्रिय योगदान दिले.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा फाटा यांच्या समन्वयाने केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर तर्फे दत्तसागर तलावाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी त्यात सामील झाले. केंद्रीय संचार ब्युरोने सहभागींच्या सोयीसाठी कचराकुंड्या आणि सेल्फी स्टँडची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमात स्वच्छतेसाठी निरंतर प्रयत्नांच्या महत्त्वावर जोर देण्यात आला.

राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग दिसून आला आणि नागरिकांनी स्वच्छतेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

***

S.Patil/A.Save/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962862) Visitor Counter : 117


Read this release in: English