माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरदर्शनच्या ५१व्या वर्धापनदिनानिमित्त सह्याद्री वाहिनीवरून चार नवे कार्यक्रम प्रसारित होणार
जागो ग्राहक, गोष्टी गाण्यांच्या, कथा सईची आणि विज्ञान विषयक कार्यक्रमांचा समावेश
Posted On:
30 SEP 2023 6:03PM by PIB Mumbai
पुणे, दि. 30 सप्टेंबर 23
दूरदर्शनच्या ५१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांसाठी चार नवे कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कोरोना काळात बंद करण्यात आलेले सह्याद्री वाहिनीवरील दोन कार्यक्रमही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.

या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

याप्रसंगी, मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रम विभागाचे प्रमुख श्री. संदीप सूद म्हणाले की नव्या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या जीवनप्रवासावर आधारित एक कार्यक्रम आहे. सई परांजपे यांचे भारतीय सिनेसृष्टी तसेच दूरदर्शनच्या वाटचालीत मोठा वाटा राहिलेला आहे.
सई परांजपे म्हणाल्या की, दूरदर्शनने आजवर एकापेक्षा एक दर्जेदार अशा कार्यक्रमांची निर्मिती केली. आपण त्यांचा भाग होतो, याचा आनंद वाटतो.
त्या पुढे म्हणाल्या, की मी मुळात लेखिका आहे. लेखन हीच माझी पूर्वीपासून आवड होती. पुढे दिग्दर्शनात उतरल्यानंतर याचा फायदा झाला. आजही चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. आजच्या काळात नव्या दमाचे कलाकार वास्तववादी आणि खिळवून ठेवणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असल्याचं समाधान वाटतं, असंही त्या म्हणाल्या.

यावेळी, पत्र सूचना कार्यालय पुणेचे उपसंचालक श्री. महेश अय्यंगार, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणेच्या टीव्ही विभागाचे अधिष्ठाता मिलिंद दामले, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणेचे निबंधक सईद रबी हाश्मी यांच्यासह या कार्यक्रमांचे निर्माते आणि दिग्दर्शक मीना गोखले, उमा दीक्षित, राजेंद्र दळवी, निरंजन पाठक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मृण्मयी भजक यांनी केले.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या कार्यक्रमांची थोडक्यात महिती -
१) जागो ग्राहक
‘जागो ग्राहक’ हा एक तासाचा साप्ताहिक कार्यक्रम असेल.
ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा असला तरी बाजारपेठेत तो पावलोपावली फसवला जात असल्याचा अनुभव येतो.
त्यामुळे याबाबत जनजागृतीसाठी मुंबई ग्राहक प़चायत या ग्राहक संस्थेच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे.
या चर्चेचे सूत्र संचालन रश्मी आमडेकर करतील. तर, सल्लागार म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड शिरीष देशपांडे काम पाहणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती आणि दिग्दर्शन भारत हरणखुरे यांनी केले आहे.
कार्यक्रमाची वेळ –
२ ऑक्टोबरपासून दर सोमवारी संध्याकाळी ०७.३० वाजता
पुनःप्रसारण – दर मंगळवारी दुपारी ०२.३० वाजता आणि दर बुधवारी सकाळी १०.०० वाजता
२) गोष्टी गाण्याच्या -
आपल्या महाराष्ट्राला संगीताची खूप मोठी परंपरा लाभली आहे. अनेक गीतकार, संगीतकार, गायकांनी ही परंपरा अधिकच समृद्ध केली आहे.
संगीतातली एखादी रचना जेंव्हा तयार होते तेंव्हा त्याची प्रक्रिया किती कठीण असते, ही प्रक्रिया कशी असते याची उत्सुकता सर्वांना असते.
अशाच काही गाण्यांच्या निर्मितीच्या कथा उलगडणारा कार्यक्रम सह्याद्री वाहिनी घेऊन येत आहे.
गीतसंगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत गीतकार, संगीतकार, गायक जोडींकडून आपण अनुभव घेणार आहोत.
कार्यक्रमाची वेळ –
१२ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी. ७:३० वाजता
पुनःप्रसारण दर शनिवारी दुपारी ०१.३० ते ०३.३० वाजेपर्यंत आणि दर शनिवारी रात्री १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत
आत्तापर्यंत संगीत क्षेत्रातील या जोड्यांच्या मुलाखतीचं ध्वनि-चित्र मुद्रण झालेलं आहे.
० किशोर कदम, मिलिंद इंगळे
० निलेश मोहरीर, अश्विनी शेंडे
० उत्तरा केळकर, आप्प्पा वढावकर
० कौशल इनामदार, अशोक बागवे
० वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर
० अविनाश चंद्रचूड, विश्वजीत जोशी
० विनय राजवाडे, माधुरी करमरकर
० नंदेश उमप, उर्मिला धनगर
० मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र
तसेच, पुढील भागांमध्ये संगीत क्षेत्रातील नावाजलेले नामवंत कलावंत आपली हजेरी लावणार आहेत.
या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन उत्तरा मोने करणार आहेत. तर निर्मिती आणि दिग्दर्शन निरंजन पाठक यांचं आहे.
३) कथा सईची
ज्येष्ठ लेखिका, नाट्य सिनेदिग्दर्शक आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सई परांजपे यांच्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणी आणि दूरदर्शनमधून झाली.
पुढे बालरंगभूमी, बाल चित्र समिती, फिल्म्स डिव्हिजन, आणि मेनस्ट्रिम सिनेमापर्यंत त्यांनी मजल मारली.
गोष्ट सईची या कार्यक्रमात त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला जाईल. विशेष म्हणजे, सई परांजपे स्वतः आपल्या या अनोख्या प्रवासाबाबत कार्यक्रमात सविस्तवरपणे सांगतील.
कार्यक्रमाची वेळ –
येत्या १५ ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी ०९.०० वाजता
पुनःप्रसारण – दर रविवारी रात्री १०.०० वाजता आणि दर बुधवारी दुपारी ०१.३० वाजता
4) विज्ञान विषयक कार्यक्रम –
आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर कसा होतो, यावर आधारित हा कार्यक्रम आहे. आपल्या नेहमीच्या दिनचर्येतही विज्ञान लपलेला असतो. पण कधी कधी ते आपल्या लक्षात येत नाही.
याबाबत माहिती देऊन आपल्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमात काही प्रयोग करून दाखवण्यात येतील. तसेच तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मुलाखतीही यामध्ये पाहायला मिळतील.
प्रक्षेपण वेळ –
येत्या नोव्हेंबर महिन्यापासून दर शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता
पुनःप्रसारण – दर रविवारी दुपारी ०१.३० वाजता आणि दर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता.
वरील ४ कार्यक्रमांव्यतिरिक्त, कोरोना काळात काही कारणास्तव बंद राहिलेल्या सिंधू धारा आणि क्रीडांगण हे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
सिंधू धारा कार्यक्रमाची वेळ
येत्या ५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संध्याकाळी ०६.०० वाजता
पुनःप्रसारण – दर शुक्रवारी रात्री १०.०० वाजता आणि शनिवारी दुपारी ३.३० वाजता
क्रीडांगण कार्यक्रमाची वेळ –
येत्या ३ ऑक्टोबरपासून दर मंगळवारी संध्याकाळी ०६.०० वाजता
पुनःप्रसारण – दर गुरुवारी सकाळी १०.०० वाजता
***
प. सू. का. पुणे / H.R. Akude/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962405)
Visitor Counter : 220