संरक्षण मंत्रालय

मुंबईतील नौदल गोदीत स्वदेशीकरण परिसंवादाचे (INDSEM 23) आयोजन

Posted On: 27 SEP 2023 7:57PM by PIB Mumbai

मुंबई, 27 सप्‍टेंबर 2023

 

मुंबईतील नौदल गोदी, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (FICCI) यांच्या सहकार्याने, 27 सप्टेंबर 2023 रोजी "स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे आत्म- निर्भरतेच्या दिशेने वाटचाल" या केंद्रीय संकल्पनेवर आधारीत "INDSEM 23" या परिसंवादासह एक प्रदर्शन आयोजित केले होते. व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम , फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, पश्चिम नौदल कमांड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी मुख्य भाषणही केले. या कार्यक्रमाला उद्योग, शैक्षणिक आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या आस्थापनांमधील सुमारे 200 प्रतिनिधी उपस्थित होते.

नौदल गोदीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या पहिल्या प्रदर्शन आणि  परिसंवादात, उद्योग भागीदारांनी त्यांचे  स्वदेशी तंत्रज्ञान प्रदर्शित केले. भारतीय नौदलासाठी उद्योग  ते ग्राहक (B2C) प्रारुपानुसार प्रकल्पात सहभागी उद्योगांना संभाव्य संधींचा शोध घेण्याची संधी देखील हा मंच प्रदान करणार आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या एका संयुक्त स्टॉलवर थेट परस्परसंवादाद्वारे जहाजे, पाणबुड्या आणि विमानांच्या सर्व अंतिम वापरकर्त्यांच्या गरजा उद्योगासमोर मांडण्यात  आल्या.

या परिसंवाद आणि प्रदर्शनाचे उद्दिष्ट उद्योग भागिदार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भाभा अणू संशोधन केंद्र, इस्रो आणि शैक्षणिक संस्था यासारख्या सर्व भागधारकांना सरकारच्या आत्मनिर्भरता दृष्टीकोनाच्या  अनुषंगाने स्वदेशी क्षमता आणि नाविन्यपूर्ण उपाय प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आहे. याशिवाय, इस्रो, डीआरडीओ, बीएआरसी आणि इतर सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांद्वारे स्वदेशीकरणातील काही यशोगाथा देखील सादर करण्यात आल्या. भारतीय नौदलात तत्सम पद्धती विकसित करण्याच्या दिशेने पुढील विचारमंथनासाठी अंतर्दृष्टी प्रदान करण्याच्या उद्देशाने या यशोगाथा सादर केल्या गेल्या.

या परिसंवादात फिक्कीचे अध्यक्ष अरुण टी रामचंदानी, बीएआरसीच्या संसाधन नियोजन गटाचे समूह संचालक जो मोहन, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि इस्रो मधील यूआर राव अंतराळ केंद्राचे संचालक एम शंकरन, डीआरडीओच्या महासंचालक (उत्पादन समन्वय आणि सेवा विभाग) डॉ. चंद्रिका कौशिक यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय नौदल कर्मचारी, आयआयटी (मुंबई) आणि बीट्स, पिलानी सारख्या शैक्षणिक संस्थेच्या सदस्यांनी आपले संशोधन प्रबंध सादर केले.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961450) Visitor Counter : 93


Read this release in: English