कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील शेतकऱ्यांना पेरणी पासून तर कापणीपर्यंत सर्व स्तरावर कीटनाशकासंबंधी आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे गरजेचे वनस्पती संरक्षण, विलग्नता आणि संग्रह संचालनालयाच्या संयुक्त सचिव सुनीता पांडे यांचे प्रतिपादन



केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन राज्यस्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ

Posted On: 27 SEP 2023 7:41PM by PIB Mumbai

नागपूर, 27 सप्टेंबर 2023

 

देशातील शेतकऱ्यांना पेरणी पासून तर कापणीपर्यंत सर्व स्तरावर कीटनाशकासंबंधी आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणे गरजेचे असून यासाठी कृषी अधिकारी यांची महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या वनस्पती संरक्षण, विलग्नता आणि संग्रह संचालनालयाच्या संयुक्त सचिव सुनीता पांडे यांनी आज केले.केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील व मध्यप्रदेशमधील ४० कृषी अधिकाऱ्यांसाठी कापुस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर १ महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन आज श्रीमती पांडे यांच्या हस्ते झाले नागपूर मधील हॉटेल एअरपोर्टसेंटर पॉईंट येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   

याप्रसंगी केंद्रीयकापूस संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, क्षेत्रीय एकीकृत किड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे संयुक्त संचालक डॉ. ए.के.बोहरिया , नागपूरचे जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

देशात आयात - निर्यात होणाऱ्या कीटनाशकावर नियंत्रण ठेवण्याचे काम वनस्पती संरक्षण, विलग्नता आणि संग्रह संचालनालया मार्फत केल्या जात असून देशातील सर्व कीटनाशकांची मानांकन आणि नोंदणी वनस्पती या संचालनयामार्फत केली जाते. देशात संचालनायाची ३६ केंद्रे असून महाराष्ट्र राज्याचा व्याप मोठा असून राज्यात नागपूर येथे एकिकृत कीड व्यवस्थापन केंद्र आहे. मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना नवीन कीटका बद्दल माहिती उपलब्ध होवून त्यावर कोणते कीटनाशक वापरावे याबद्दल कमी वेळात मार्गदर्शन मिळावे यासाठी आपला विभाग तत्पर असल्याचे संचालनालयाच्या संयुक्त सचिव सुनीता पांडे यांनी यावेळी सांगितले.

  

देशात पिकविल्या जाणाऱ्या कापसाला बदलत्या हवामानानुसार अनुरूप आणि आंतरपीक म्हणून विकसित करणे गरजेचे असल्याचे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर, संचालक डॉ. वाय.जी.प्रसाद यांनी सांगितले.कापसाच्या लागवडीत आणि कापणीत वेगवेगळे तंत्रज्ञान आले असून हायब्रीड कापसाने देशी कापसाची जागा घेऊन कापूस उत्पादनात आमुलाग्र असा बदल केला आहे. मागील काही काळापासून शेतकरी बोंडअळीच्या त्रासापासून त्रस्त होते तसेच कीटनाशकांची फवारणीची सुद्धा जुनीच पद्धत वापरल्या जात होती. तंत्रज्ञानामुळे या सर्व समस्या संपुष्टात आणल्या गेल्या आहेत.शेतकऱ्यांना कीटनाशकांचा आधुनिक वापर,खर्च कपाती संबंधी उपाययोजना आणि उत्तम तंत्रज्ञान पोहोचविणे आपले आरोग्य कर्तव्य असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. 

कीड व्यवस्थापन आणि कीटनाशक या विषयावर सखोल असे ३० दिवस मुदतीचे प्रशिक्षण मिळणे हे दुर्मिळच आहे.या प्रशिक्षणाचा कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्नशील आपण असायला हवे. असे आवाहन नागपूरचे जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे यांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षणातून मिळणारे प्रशिक्षण हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उपयोगात आले पाहिजे तसेच खेडे पातळीवर सुद्धा उत्तमरीत्या पोहोचले पाहिजे. हे प्रशिक्षण उत्तमरीत्या पार पडण्यासाठी विविध केंद्रीय विभागाची मदत मिळाली असून हे प्रशिक्षण नक्कीच कीटनाशक व कीडव्यवस्थापनयामध्ये बदल घडवून आणेल असा विश्वास केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे सचिव आणि प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. ए .के. बोहरिया यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना व्यक्त केला.

केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील ४० कृषी अधिकाऱ्यांसाठी कापुस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम 27 सप्टेंबर पासून चालू झाले असून २७ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर या एक महिना चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यान यांच्याद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्षेत्रीय एकीकृत किड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे उपसंचालक डॉ. मनीष मुंडे यांनी केले. कार्यक्रमाला विविध केंद्रीय तसेच राज्य शासकीय कृषी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

PIB Nagpur | S.Rai/D.Wankhede/D.Dubey

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1961425) Visitor Counter : 90


Read this release in: English