माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे इथल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात देव आनंद शताब्दी सोहळा आयोजित

Posted On: 22 SEP 2023 3:20PM by PIB Mumbai

पुणे, 22 सप्टेंबर 2023

सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंती निमित्त, 26 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ( एनएफएआय)च्या वतीने  देव आनंद यांच्या सात चित्रपटांचे सादरीकरण केले जाणार आहे.

देव आनंद यांना आदरांजली  वाहण्यासाठी आणि त्यांच्या 100 व्या जयंती निमित्त त्यांचे चार सर्वोत्तम चित्रपट 4K रिझोल्यूशनमध्ये एनएफडीसी-एनएफएआयने, पुनर्संचयित केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटांच्या जतनासाठी निधी दिला आहे. गाईड, ज्वेल थीफ, आणि जॉनी मेरा नामचे 35 मिमी आणि सीआयडीचे 35 मिमी डुप निगेटिव्हचे  अत्याधुनिक आर्काइव्हल फिल्म स्कॅनरवर 4K रिझोल्यूशनमध्ये स्कॅन केले गेले आहे.  संबंधित चित्रपट एनएफडीसी-एनएफएआयमधे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता नियंत्रित वातावरणात अनेक दशकांपासून जतन केले गेले आहेत.  दीर्घकालीन जतनामुळेच हे सार्वकालिक चित्रपट नवीन 4K तंत्रज्ञानात जतन करणे  शक्य झाले आहे. या माध्यमातून, देव आनंद यांच्या कारकिर्दीची नव्या पिढीला ओळख करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एनएफडीसी-एनएफएआयचा मानस आहे.

देव आनंद यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर, एनएफडीसी-एनएफएआय गेल्या अनेक महिन्यांपासून  त्यांच्या काही चित्रपटाच्या जतन-संवर्धनावर काम करत आहे. यात प्रत्येक फ्रेम-दृश्य काळजीपूर्वक जतन केले जात आहे. कालौघात त्यावर साचलेली धूळ, घाण, चरा किंवा तडा, छिद्र, ओरखडे आदी डिजिटल पद्धतीचा वापर करुन दूर केले आहेत.

3 तासांच्या चित्रपटात 2.5 लाखांहून अधिक फ्रेम्स-दृश्य असतात, त्यावर काम करणे आवश्यक आहे. यानंतर रंगाची वर्गवारी केली जाते. जेणे करून चित्रपट प्रदर्शित करताना  तो उत्तम दिसावा यासाठी रंग फिकट होण्यासारख्या समस्येचे निराकरण केले जाते.  त्याचबरोबर चित्रपटाचा ध्वनी देखील  डिजिटल माध्यमात जतन केला जात आहे.  याची अंतिम प्रत तयार होईल तेव्हा  प्रेक्षकांना वाटेल की जणू काही फोटोकेमिकल फिल्म लॅबमध्ये प्रक्रिया करून नवी कोरी ताजी प्रत आली आहे.

एनएफडीसी-एनएफएआय पुणे इथल्या मुख्य चित्रपटगृहात हा चार दिवसांचा महोत्सव होणार आहे.  एनएफडीसी-एनएफएआयने विचारपूर्वक निवडलेले चित्रपट यात प्रदर्शित केले जातील.  देव आनंद यांच्या "बाजी" (1951), "सी.आय.डी." (1956), "असली-नकली" (1962), "तेरे घर के सामने" (1963), "गाइड" (1965), "ज्वेल थीफ" (1967), आणि "जॉनी मेरा नाम" (1970) या सिनेमातील दमदार अभिनयाचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल. चित्रपटांचे सादरीकरण 35 मिमी प्रिंट्स आणि 4K जतनाचे मिश्रण असेल. यात, "बाजी", "असली-नकली", "तेरे घर के सामने" 35 मिमी प्रिंटमध्ये आणि "सी.आय.डी.", "गाईड", "  ज्वेल थीफ, आणि "जॉनी मेरा नाम" 4k रिझोल्यूशनमध्ये असतील. चित्रपट प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आहे.  पुनर्संचयित केलेले चित्रपट 23 आणि 24 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात पीव्हीआर आणि आयनॉक्समधेही प्रदर्शित केले जातील.

एनएफडीसी- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय गतकाळातील अभिजात चित्रपटांचे जतन संवर्धन करून, दर्जेदार 4K गुणवत्तेत सादर करण्यासाठी वचनबद्ध आहे.  असंख्य चित्रपट सध्या पुनर्संचयित केले जात आहेत. येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना अशा  अनेक प्रदर्शनांची संधी मिळत राहील अशी अपेक्षा आहे.

N.Meshram/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1959640) Visitor Counter : 128


Read this release in: English