अर्थ मंत्रालय

अंमली पदार्थ तस्करीच्या म्होरक्याला अटक

Posted On: 17 SEP 2023 3:10PM by PIB Mumbai

 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(डीआरआय) अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यामधील म्होरक्या  असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करून अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधातील लढ्यात मोठे यश मिळवले आहे.

डीआरआयने केलेल्या अनेक कारवायांच्या मालिकेच्या पाठबळावर ही मोहीम राबवण्यात आली. याची सुरुवात 28 जुलै 2023 रोजी झाली ज्या दिवशी एका कुरियर टर्मिनलवर 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे महाराष्ट्रात मुंबईजवळ असलेल्या नालासोपारा येथे अतिशय नियोजनबद्ध आणि नियंत्रित पद्धतीने राबवलेल्या मोहिमेत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. अटकेनंतर या दोघांच्या चौकशीतून आणि डिजिटल उपकरणांच्या न्यायवैद्यक विश्लेषणातून डीआरआयच्या अधिकाऱ्यांना नवी दिल्लीतून या अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या म्होरक्याची ओळख पटवता आली.

अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि बारीक देखरेखीद्वारे डीआरआय अधिकाऱ्यांना या आरोपीचे निश्चित स्थान अतिशय अचूकपणे ओळखता आले. अतिशय काळजीपूर्वक मोहीम राबवून डीआरआयच्या पथकाने या सूत्रधाराला दिल्लीच्या उत्तम नगर भागातून ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला आणण्यात आले आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. हा आरोपी आता डीआरआयच्या कोठडीत असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958260) Visitor Counter : 85


Read this release in: English