अर्थ मंत्रालय

महसूल गुप्तचर संचालनालयाने सुपारीच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

Posted On: 10 SEP 2023 4:35PM by PIB Mumbai

 

मुंबई, 10 सप्टेंबर 2023

गुप्त माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई येथील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरु बंदरात 14 40 फुटी कंटेनर्स  ताब्यात घेतले.

तळेगाव येथील अंतर्देशीय कंटेनर डेपो येथे पाठवण्यात येणार असलेल्या या कंटेनर्समध्ये सुपाऱ्या लपवलेल्या आहेत असा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तळेगाव येथील डेपोमध्ये पोहोचण्यापुर्वीच हे चोरण्यात येतील किंवा बदलले जाऊन  दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात येतील असा संशय आल्याने हा माल जेएनपीटी बंदरातच थांबवून ताब्यात घेण्यात आला.

आयातविषयक प्रकटीकरण तपशील तसेच बिलात जाहीर केल्यानुसार या कंटेनर्समध्ये कॅल्शियम नायट्रेटहे रसायन असणे अपेक्षित होते. मात्र, कंटेनर्सची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की हे फसवणुकीसाठी चुकीचे घोषणापत्र सादर करण्याबाबतचे प्रकरण आहे आणि त्या सगळ्याच 14 कंटेनर्समध्ये सुपाऱ्या भरलेल्या असून कॅल्शियम नायट्रेट च्या नावाखाली त्यांची भारतात तस्करी करण्यात आली आहे.

परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या दर एक टन वजनाच्या सुपाऱ्यांवर केंद्र सरकार 10,379 अमेरिकी डॉलर्स इतके शुल्क आकारते.  म्हणजेच, आज ताब्यात घेण्यात आलेल्या 14 कंटेनर्स मधील एकूण 3,71,090 किलो (371 टन) म्हणजेच सुमारे 32.31कोटी रुपयांच्या सुपाऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

फोडलेल्या सुपाऱ्यांवर त्यांच्या एकूण किमतीच्या 110% आयात शुल्क लागू होत असते. म्हणजेच,उपरोल्लेखित प्रकरणात अंदाजे 36 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडवण्याचा प्रयत्न झाला होता. तस्करी करून देशात आणण्यात येणाऱ्या सुपाऱ्यांच्या जप्तीपैकी ही मोठ्या प्रमाणातील जप्ती आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

***

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1956058) Visitor Counter : 84


Read this release in: English