अर्थ मंत्रालय
फिनटेक कंपन्यांचे तंत्रज्ञानविषयक संशोधन हा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, संस्थात्मक व्यवस्था आणि धोरणात्मक उपक्रमांमधील परस्पर संवादाचा परिणाम आहे: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास
भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि खाजगी कंपन्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 मध्ये सहभागी
Posted On:
06 SEP 2023 8:58PM by PIB Mumbai
मुंबई, 6 सप्टेंबर 2023
“2030 पर्यंत, भारताचे फिनटेक क्षेत्र जागतिक फिनटेक उद्योगाच्या एकूण महसुलाच्या अंदाजे 13% योगदान देऊ शकेल. फिनटेक कंपन्यांचे तंत्रज्ञानविषयक संशोधन हा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, संस्थात्मक व्यवस्था आणि धोरणात्मक उपक्रम यांच्यातील परस्पर संवादाचा परिणाम आहे,” असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 मध्ये बोलत होते. 'भारतात आर्थिक लोकशाहीचा उदय : फिनटेकचा रंजक प्रवास ' या बीजभाषणात त्यांनी डिजिटल पेमेंट, सर्वसमावेशक बँकिंग, सूक्ष्म वित्तपुरवठा, नियामक प्रगती आणि वित्तीय सुगम्यता , व्यक्तींना सक्षम बनवणे आणि आर्थिक वाढीस चालना देणे यांसारख्या क्रांती घडवून आणणाऱ्या विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल (FCC) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ग्लोबल फिनटेक फेस्ट ही सर्वात मोठी फिनटेक परिषद आहे. फिनटेक क्षेत्रातील अग्रणींना सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि उद्योगाच्या भविष्यासाठी आराखडा विकसित करण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
चौथा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 5 ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत होत आहे. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023ची संकल्पना 'सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत अशा जबाबदार वित्तीय व्यवस्थेसाठी जागतिक सहकार्य' अशी आहे.
यावर्षी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 500 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत.
रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे पॅव्हेलियन हे फिनटेक कंपन्यांशी संपर्क साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा भर प्रामुख्याने धोरण आखणीवर आहे जो पेमेंट प्रणाली आणि सुरक्षा वैशिष्ट्यांचा आधारस्तंभ आहे.
भारतीय स्टेट बँकेने गेल्या काही वर्षांपासून बँकिंग उद्योगाला पेमेंट सोल्यूशन देण्यावर भर दिला आहे. या फेस्टमध्ये सहभागी होऊन, ते प्रदर्शनात योग्य भागीदाराचा शोध घेत आहेत ज्यांच्यासोबत ते ग्राहकांना सेवा पुरवू शकतील.
ग्लोबल फिनटेक फेस्ट मधील इंडिया पोस्टचे दालन आधार बेस खाते, झिरो बॅलन्स डाउन पेमेंट आणि त्वरित खाते उघडण्याबरोबरच दारात बँकिंग व्यवस्था पुरवणे यासारख्या नवीन डिजिटल सेवांबाबत माहिती प्रदान करते.
"डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा" बरोबरच "निधीच्या वेगवान प्रवाहासाठी राष्ट्रीय जलद पेमेंट प्रणालीच्या आंतरपरिचालन बाबत राष्ट्रीय अनुभव आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांवरील माहितीची देवाणघेवाण " हे भारताच्या G20 अध्यक्षतेखालील आणखी एक प्राधान्य क्षेत्र आहे.
याच भावनेने, ग्लोबल फिनटेक फेस्ट 23 हे हितधारकांमध्ये जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, प्रमुख समस्यांचा शोध घेण्यासाठी आणि सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत जगाच्या उभारणीत योगदान देणारे उद्योग मॉडेल तयार करण्याप्रति समर्पित आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1955296)
Visitor Counter : 168