नौवहन मंत्रालय

विविध ठिकाणच्या सागरी क्षेत्रातील हितधारकांना जोडण्यासाठी तिसऱ्या ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 वरील हायब्रीड रोड शोचे मुंबईत आयोजन


जागतिक सागरी शिखर परिषद सागरी क्षेत्राच्या जलद वाढीसाठी अभिनव कल्पनांची देवघेव सुलभ करेल: केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री

सागरी व्यापारातील तंत्रज्ञान विषयक बदल लक्षात घेता, आपण खलाशांचे कौशल्य वाढवण्यावर आणि त्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने शक्य ते सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज : राज्यमंत्री, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय

Posted On: 06 SEP 2023 6:50PM by PIB Mumbai

मुंबई, 6 सप्‍टेंबर 2023

 

बहुप्रतिक्षित तिसऱ्या ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 च्या अनुषंगाने, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, नौवहन महासंचालनालय आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने मुंबईत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आवारात दुसरा रोड शो आयोजित केला होता. हायब्रीड स्वरूपात आयोजित या रोड शो ने ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 साठी वातावरण निर्मिती केली, ज्याचा उद्देश सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट अधिकारी, सागरी क्षेत्रातील संबंधित तसेच सागरी क्षेत्रातील उत्साही लोकांना भारतातील सागरी क्षेत्राच्या भविष्याविषयी चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी एका समान व्यासपीठावर आणणे हा होता.

आजच्या रोड शो दरम्यान दाखवण्यात आलेल्या व्हिडिओ संदेशात, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 हा भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेला चालना देणारा, गुंतवणूक सुलभ करताना जागतिक आणि प्रादेशिक अशा दोन्ही भागीदारींना चालना देणारा महत्त्वपूर्ण जागतिक उपक्रम म्हणून काम करेल. या प्रमुख कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी समुदाय धोरणात्मक भागीदारीसाठी एकत्र येतील असे केंद्रीय सोनोवाल म्हणाले. ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 सागरी भागधारक, धोरणकर्ते, नियामक आणि उद्योजकांना एकत्र आणेल असे केंद्रीय मंत्री म्हणाले. या परस्पर संवादात्मक आदानप्रदानाद्वारे हा मंच सागरी पायाभूत सुविधांच्या समस्यांवर विचारमंथन करण्याची एक अनोखी संधी उपलब्ध करून देतो. या शिखर परिषदेच्या निमित्ताने सागरी क्षेत्राच्या वेगवान वाढीसाठी अभिनव कल्पनांची देवघेव देखील होईल असे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी सांगितले.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर व्हिडिओ संदेशात म्हणाले की ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 आमच्या सागरी परिदृश्याच्या भविष्याला आकार देईल. ते पुढे म्हणाले की भारत जागतिक स्तरावर अग्रेसर होत असताना, प्रभाव पाडण्यासाठी, आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रादेशिक आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यात त्याची सागरी क्षमता अधिक महत्वपूर्ण बनली आहे. आघाडीची सागरी शक्ती बनण्यासाठी, आपण सहकार्य वाढवणे, नवोन्मेषाचा अवलंब आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. “आपले ध्येय पायाभूत सुविधांचा विस्तार, लॉजिस्टिक स्पर्धात्मकता वाढवणे, औद्योगिकीकरणाला चालना देणे, रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करणे आणि आपली सागरी अर्थव्यवस्था मजबूत करणे हे आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आपल्या समन्वित प्रयत्नांमुळेच आपण अभूतपूर्व वाढीची क्षमता साकारू शकतो आणि समृद्ध भविष्याचा मार्ग सुकर करू शकतो.” असे  राज्यमंत्री म्हणाले.

भारत हा खलाशी पुरवणारा जगातील सर्वोत्कृष्ट पुरवठादारांपैकी एक आहे असे सांगून नौवहन राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले, यापुढील काळात भारतीय खलाशी, सागरी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणासाठी मोठी मागणी असेल. सागरी व्यापारातील तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेता आपण खलाशांचे कौशल्य वाढवण्यावर आणि त्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी शक्य तितके सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

या रोड शोमध्ये बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सहसचिव, सागरमाला, भूषण कुमार, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष डॉ. संजीव रंजन, मुंबई बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष राजीव जलोटा, शिपिंग कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी.के. त्यागी आणि नौवहन उप महासंचालक  ऍश मोहमद, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 बद्दल:

ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट 2023 हा उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना संधींचा शोध, आव्हाने समजून घेण्यासाठी आणि भारताच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एकत्र आणणारा एक प्रमुख सागरी क्षेत्र केंद्रित कार्यक्रम आहे. 2016 आणि 2021 च्या यापूर्वीच्या परिषदांप्रमाणे शिखर परिषदेच्या या तिसऱ्या आवृत्तीचे उद्दिष्ट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सागरी हितधारक आणि गुंतवणूकदारांसाठी व्यापक संधी उपलब्ध करून देणे हे आहे.

सागरी क्षेत्रातील विविध क्षेत्रांतील प्रदर्शक आणि गुंतवणूकदारांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी या शिखर परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट 2023 चा संपूर्ण अजेंडा आणि नोंदणी तपशीलांसह अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.maritimeindiasummit.com या  अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955256) Visitor Counter : 111


Read this release in: English