शिक्षण मंत्रालय
गोव्यातील अविनाश मुरलीधर पारखे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
Posted On:
04 SEP 2023 1:49PM by PIB Mumbai
गोव्यातील दिशा स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनचे अविनाश मुरलीधर पारखे यांची राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या 2023 च्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 5 सप्टेंबर 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 75 निवडक पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
अविनाश मुरलीधर पारखे यांनी गोव्यातील विशेष शिक्षणात क्रांती घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. पणजी येथील दिशा स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन मध्ये सर्टिफाइड स्पेशल एज्युकेटर म्हणून 30 वर्षांचा कार्यकाळ असलेल्या पारखे यांनी बौद्धिक अपंग व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि रोजगार निर्मितीसंदर्भात अमिट ठसा उमटवला आहे.
पारखे यांचा शिकवण्याचा दृष्टिकोन त्याच्या सर्जनशीलता आणि अनुकूलतेमुळे वेगळा आहे. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवन कौशल्ये आणि मूलभूत शिक्षण संकल्पनांनी सक्षम तर केलेच, शिवाय स्वतंत्र जगण्याची कौशल्येही जोपासण्याची प्रेरणा दिली. शालेय ध्येयाला पुढे नेण्यासाठी आणि शालेय नावनोंदणीला चालना देण्यासाठी, त्यांनी विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी स्क्रीनिंग आणि डिटेक्शन शिबिरांचे आयोजन केले आहे. व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा स्थापित केली आहे, प्रारंभिक उत्तेजन कार्यक्रम सुरू केला आहे आणि ऑन-द-जॉब प्रशिक्षण आणि जॉब प्लेसमेंट उपक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे.
अविनाश पारखे यांचे एक उल्लेखनीय कार्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अद्वितीय गरजा आणि क्षमतेनुसार वैयक्तिक अभ्यासक्रम विकसित करणे. या दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांचे सामाजिकीकरण आणि त्यांचे समवयस्क आणि पालकांशी संवाद तर सुधारला आहेच, शिवाय शिकण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला आहे.
गुणवत्ता प्रमाणपत्र, 50 हजार रुपये रोख आणि रौप्यपदक असे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.
***
ST/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1954576)
Visitor Counter : 136