संरक्षण मंत्रालय

‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड यांच्या हस्ते झाले जलावतरण


अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज आहे

आज जलावतरण झालेली ‘महेंद्रगिरी’ ही प्रोजेक्ट 17ए या प्रकल्पातील 7 वी स्टेल्थ विनाशिका

Posted On: 01 SEP 2023 5:40PM by PIB Mumbai

मुंबई, 1 सप्टेंबर 2023

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज   ‘महेंद्रगिरी’ या माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या  युद्धनौकेचे मुंबईत जलावतरण करण्यात आले . महेंद्रगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरीकुमार आणि एमडीएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल  यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि एमडीएलचे कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, महेंद्रगिरी या  निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली 75 टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमईकडून खरेदी करण्यात आलेली आहेत ही बाब अतिशय प्रशंसनीय आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.  महेंद्रगिरी या, प्रोजेक्ट 17 ए श्रेणीतील सातव्या युद्धनौकेचे जलावतरण म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाबाबतच्या वचनबद्धतेचा अतिशय योग्य असा दाखला आहे, असे ते म्हणाले.

अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज आहे, असे भारताच्या नौदल सामर्थ्याच्या महत्त्वावर भर देत उपराष्ट्रपतींनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले,विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे व्यापाराच्या आकारमानात वाढ असा अर्थ आहे. भारताच्या व्यापारापैकी 90 टक्के मालाची वाहतूक सागरी मार्गाने होते. ही बाब विचारात घेता आपला विकास आणि आपली प्रगती यामध्ये महासागरांचे महत्त्व आणखी जास्त अधोरेखित होते. वाढत्या क्षमतेबरोबरच जबाबदारीत देखील वाढ होते. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत एक संपूर्ण सुरक्षा पुरवठादार म्हणून उदयाला येत आहे. आज आपण एक सुरक्षित आणि त्याबरोबरच महासागरावरील शांततापूर्ण, नियम आधारित सागरी व्यवहार सुनिश्चित करणारे महत्त्वाचा जागतिक देश आहोत. हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील जास्त व्यापक सुरक्षा यांच्यासमोर विविध प्रकारची आव्हाने आहेत. भारतीय नौदल भारताच्या सागरी हितसंबंधाचे रक्षण, संवर्धन आणि त्यांना चालना देण्याचे काम अतिशय जबाबदारीने आणि पूर्ण क्षमतेने करत आहे. याबद्दल मी या दलाचे अभिनंदन करतो. 

आपल्या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी ‘धरोहर’ या माझगाव डॉक्स लि येथील  हेरिटेज म्युझियमलाही भेट दिली.

महेंद्रगिरी, हे नाव ओरिसा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आले आहे, प्रकल्प 17A फ्रिगेट्स श्रेणीतील  ही सातवी युद्धनौका आहे. ही युद्धनौका प्रोजेक्ट 17 क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास) ची  फॉलो-ऑन, अर्थात सुधारित आवृत्ती असून, यामध्ये सुधारित स्टेल्थ अर्थात विनाशिकेची  वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि संवेदन प्रणाली आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. महेंद्रगिरी युद्धनौका ही तांत्रिक दृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि ती, भविष्यातील स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दिशेने पुढे जाताना, स्वतःच्या समृद्ध नौदल वारशाचा अभिमान बाळगण्याच्या  भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.

ही युद्धनौका एकात्मिक बांधकाम पद्धतीचा वापर करून बनवण्यात आली असून, यामध्ये समांतर आउटफिटिंगसह हल ब्लॉक्सचा समावेश आहे. या जहाजाचे बांधकाम वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये केले गेले आहे, आणि त्यानंतर माझगाव डॉक्स लि  येथे स्लिपवेवर त्याचे एकत्रीकरण आणि उभारणी करण्यात आली आहे. महेंद्रगिरीच्या बांधणीची पायाभरणी 28 जून 2022 रोजी करण्यात आली होती, आणि ही युद्धनौका फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रत्यक्ष  कामगिरीसाठी प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. अंदाजे 3450 टन वजनाचे हे जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होईल. असेल.

प्रकल्प 17A कार्यक्रमांतर्गत, मेसर्स माझगाव डॉक्स लि    ची एकूण चार जहाजे आणि मेसर्स जीआरएसई ची तीन जहाजे बांधकामाधीन आहेत. प्रकल्प-17A जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरो, अर्थात युद्धनौका रचना संस्थेने केली आहे. ही संस्था सर्व युद्धनौकांचे डिझाइन बनवणारी अग्रणी संस्था आहे. माझगाव डॉक्स लि   आणि  जीआरएसईद्वारे 2019-2023 दरम्यान या प्रकल्पातील पहिली सहा जहाजे पुरवण्यात आली आहेत. प्रकल्प-17हा भारतात  उत्पादने  घेण्याच्यादृष्टीने विकास करून आणि आर्थिक परिप्रेक्षामधील कामगार/उद्योजक/एमएसएमईंना पाठबळ देऊन देशाच्या समृद्धीमध्ये योगदान देत आहे . अंदाजे 210 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची (एमएसएमई) या प्रकल्पामध्ये गुंतावूक असूनअंदाजे 1000 उपकंत्राटी कर्मचारी या प्रकल्पासाठी माझगाव डॉक्स लि.च्या  परिसरामध्ये कार्यरत करण्यात आले आहेत.

सुमारे 13 सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था (PSUs) जटिल उपकरणे आणि प्रणालींचा पुरवठा करून, या प्रकल्पात योगदान देत आहेत. सरकारच्या "आत्म निर्भर भारत" च्या दृष्टीकोनाला अनुसरून, प्रकल्प-17A अंतर्गत 75% पेक्षा जास्त मागण्या, एमएसएमई सहस्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. महेंद्रगिरीचे आजचे जलावतरण , हा  आपल्या देशाने स्वावलंबी नौदलाच्या उभारणीमध्ये केलेल्या अतुलनीय प्रगतीचा योग्य दाखला ठरेल.

 

Jaydevi PS/S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1954107) Visitor Counter : 169


Read this release in: English