इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

नवोन्मेषाभिमुख हरित हायड्रोजन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी आयआयटी मुंबई आणि एचएसबीसी यांच्यात भागीदारी

Posted On: 25 AUG 2023 4:08PM by PIB Mumbai

 

हरित हायड्रोजनचे उत्पादन अधिक कार्यक्षम, किफायतशीर आणि अधिक प्रमाणावर करण्याच्या दिशेने तांत्रिक आघाडीवर पाठपुरावा करण्यासाठी आयआयटी मुंबईने एचएसबीसी सोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गतहरित हायड्रोजनला धोरणात्मक पर्यायी इंधन म्हणून स्थान देणे, एक मजबूत, हरित हायड्रोजन अर्थव्यवस्था तयार करण्यात पाठबळ आणि ऊर्जा स्वयंपूर्ण राष्ट्राचे सरकारचे ध्येय साध्य करणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या भागीदारीमुळे, हरित हायड्रोजन मोहिमेत जागतिक नेतृत्व प्राप्त करण्यासाठी धोरणात्मक पाठबळ प्रदान करण्यावर केंद्रित असलेल्या सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला चालना मिळण्यास मदत होईल.

राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियानाची घोषणा 2021-22 च्या केन्द्रीय अर्थसंकल्पावेळी करण्यात आली. भारतातील उर्जेच्या पर्यायी स्त्रोतांचा लाभ घेऊन भविष्य हरित सक्षम करण्यासाठी रुपरेषा प्रदान करणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत 24 ऑगस्ट 2023 रोजी दिल्ली येथे ही भागीदारी आकाराला आली. आयआयटी मुंबई आणि एचएसबीसीचे प्रमुख सहकारी यावेळी उपस्थित होते. आयआयटी मुंबईचे अधिष्ठाता (माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट संबंध) प्रा. रवींद्र डी.  गुढी; एचएसबीसीचे समूह अध्यक्ष मार्क टकर; एचएसबीसी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, हितेंद्र दवेआणि एचएसबीसी  इंडियाच्या अलोका मजुमदार यांचा यात समावेश होता.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधरी यांनी या भागीदारीचे उद्दीष्ट विशद केले. उर्जेच्या शाश्वत आणि स्वच्छ स्त्रोतांकडे वाटचाल करणे हे हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक लढ्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हरित हायड्रोजन - त्याच्या वाहतुकीसह सर्व उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्‍या - जागतिक उर्जेमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान व्यापेल असे तै म्हणाले. आयआयटी मुंबई, एचएसबीसी  आणि शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन यांच्यातील ही भागीदारी या क्षेत्रातील संशोधनाला गती देईल आणि हरित हायड्रोजनचा व्यापक प्रमाणात अवलंब करण्याच्या दिशेने भारताचे संक्रमण सुलभ करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  एचएसबीसी इंडियाचे सीईओ हितेंद्र दवे यांनीही या उपक्रमावर भाष्य केले. शाश्वतता हा आपल्या व्यवसाय, कार्यान्वयन आणि सामुदायिक गुंतवणुकीचा मुख्य घटक आहे. हरित हायड्रोजन उत्पादन अधिक वाढवता येण्याजोगे आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. हरित हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि उपयोजनाला गती देण्यात तसेच शाश्वत आणि कमी-कार्बन ऊर्जा प्रणालीकडे संक्रमण घडवून आणण्यात आमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

हरित हायड्रोजन कार्यक्रमातील नवोन्मेषाबद्दल:

आयआयटी मुंबई आणि एचएसबीसी  यांच्यातील भागीदारीमुळे सर्व आयआयटी मधील संशोधक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांना हरित हायड्रोजन उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि वापरामधील प्रमुख आव्हानांना तोंड देणारे यशस्वी तंत्रज्ञान आणि उपाय विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. या कार्यक्रमा अंतर्गत आयआयटी मुंबई, प्रकल्प प्रस्ताव मागवेल.  एचएसबीसी इंडियाचे प्रतिनिधी, प्राध्यापक आणि बहुविद्याशाखीय क्षेत्रातील प्राध्यापक सदस्य असलेली सुकाणू समिती याचे मूल्यमापन करेल. समितीचे मूल्यांकन, प्रकल्पाची व्यवहार्यता आणि त्याची व्यावसायिक तयारी यावर सर्वोत्तम तीन प्रस्ताव  समिती निवडेल. निवड झालेल्या प्रस्तावांवर आयआयटी मुंबई येथे काम केले जाऊ शकते. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशननुसार, 2030 पर्यंत, भारताला दरवर्षी किमान 5 MMT (दशलक्ष मेट्रिक टन) हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करण्याची आशा आहे. यामुळे देशात सुमारे 125 GW ची नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढेल आणि भारताला नेट झिरोचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल.

***

S.Bedekar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952204) Visitor Counter : 101


Read this release in: English