संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी

Posted On: 24 AUG 2023 7:03PM by PIB Mumbai

 

भारताने ग्लासगो कॉप 26 मध्ये 2070 पर्यंत "नेट शून्य कार्बन उत्सर्जन" साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. केन्द्र सरकारच्या पुढाकाराने, शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारत ऊर्जा उत्पादन करताना मिश्र पद्धती स्वीकारून  अक्षय उर्जेकडे वेगाने वाटचाल करत आहे. पीआयबीच्या अहवालानुसार, एकूण स्थापित वीज क्षमतेपैकी 40% वीज गैर-जीवाश्म इंधन स्रोतापासून असून सौर ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक आहे. संरक्षण मंत्रालयानेही ऊर्जा उत्पादकता आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी संरक्षण दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याकरिता भारतीय सशस्त्र दलांमध्ये मोठ्या उत्साहाने अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना 1948 मधे झाली. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या सर्व श्रेणींना युद्धाच्या बदलत्या स्वरूपानुरुप विविध तांत्रिक आणि सामरिक पैलूंमध्ये प्रशिक्षण देणे, हा या  संस्थेचा उद्देश आहे. मित्र देशातील सैनिकांनाही येथे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने पुण्‍याच्या सीएमईने  तांत्रिक आघाडीवर विविध पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  सीएमई येथे जीई (सीएमई) खडकी कार्यालयाने लष्करी अभियांत्रिकी सेवेद्वारे सीएमईमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान बदल तसेच जागतिक तापमान वाढीच्या समस्येच्या  विरोधातील  लढ्यामध्‍ये  आघाडीवर राहण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सीएमई, पुणे येथे दोन टप्प्यांत 7 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी. सीएमई येथील सैनिकांसाठी सामुदायिक स्वयंपाकासाठी सौर उूर्जेवरील स्वयंपाकासाठीचा प्रकल्प. यासारख्या अनेक महत्त्वाच्या पथदर्शी प्रकल्पांव्यतिरिक्त कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी डीजी सेटवर रेट्रोफिटिंग एमिशन कंट्रोल डिव्हाइसेसची (आरईसीडी) उभारणी यांचा समावेश आहे.

या 7 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा 2021 मध्ये 2 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प सुरू करून हाती घेण्यात आला. केन्द्र सरकारच्या "राष्ट्रीय सौर मिशन" चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात 5 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत ग्रीडशी 5 मेगावॅटचा उर्जा प्रकल्प जोडलेला आहे. यामुळे सीएमई, पुणे येथे निर्माण होणारी वीज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला; दक्षिण कमांड रुग्णालय पुणेलष्करी रुग्णालय खडकी आणि बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटर, खडकी या पुणे शहरभर पसरलेल्या लष्‍कराच्या  कार्यस्थळांवर  ही वीज पोहचवणे शक्य होते. अशा प्रकारे पारंपरिक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांवरील अवलंबित्व कमी करून "राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम" साध्य करणे सुनिश्चित केले गेले आहे.

आघाडीवर असलेल्या भारतीय सशस्त्र दलांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. "स्वतःच्‍या आधी सेवा" हे आपले ब्रीदवाक्य त्यांनी सार्थ ठरवले आहे. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून आपला दर्जा कायम राखला आहे.

***

S.Bedekar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952201)
Read this release in: English