शिक्षण मंत्रालय
हरित उर्जा आणि शाश्वतता संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी आयआयटी मुंबई या संस्थेला 18.6 दशलक्ष डॉलर्सची देणगी
Posted On:
24 AUG 2023 10:25PM by PIB Mumbai
मुंबई, 24 ऑगस्ट 2023
मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (आयआयटी, मुंबई) हरित उर्जा आणि शाश्वतता संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी माजी विद्यार्थ्याकडून 18.6 दशलक्ष डॉलर्सची देणगी मिळाली आहे. या महत्त्वाच्या योगदानामुळे जागतिक हवामानविषयक संकटावर उपाययोजना करण्यासंदर्भातील संस्थेची भूमिका नव्याने अधोरेखित होणार आहे. आयआयटी, मुंबई या संस्थेच्या परिसरातील अत्याधुनिक इमारतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये हवामानविषयक धोक्यांचे मूल्यमापन करणे आणि त्यावर परिणामकारक उपशमन धोरणे विकसित करणे, हवामान बदलाचा स्वीकार तसेच व्यापक पर्यावरणीय निरीक्षण यांचा समावेश आहे. त्याशिवाय, हे केंद्र, हवामानविषयक उपाययोजना अधिक प्रगत करणे, नवीकरणीय उर्जा स्त्रोत आणि उर्जेच्या संदर्भात कार्यक्षम तंत्रज्ञाने यांच्या स्वीकाराला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्ये करेल.
हे केंद्र, बॅटरी तंत्रज्ञान, सौर फोटोव्होल्टेइक्स, जैवइंधने, स्वच्छ हवा विज्ञान, पुर्विषयक अंदाज तसेच कार्बन कॅप्चर यांच्यासह, मात्र यांच्यापुरते मर्यादित न राहता इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देईल. अत्याधुनिक पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थी आणि संशोधकांना समान सुविधा देऊ करणारे हे केंद्र शिक्षण आणि संशोधन यांच्यातील दुवा म्हणून देखील कार्य करेल. तसेच हे केंद्र उद्योगांसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक प्रशिक्षण देईल आणि जागतिक विद्यापीठे आणि महामंडळे यांच्याशी धोरणात्मक सहयोगी संबंधांची जोपासना करेल. हरित उर्जा आणि शाश्वततेच्या प्रांतात उद्योजकतेला खतपाणी घालण्याबरोबरच व्यावहारिक आणि परिवर्तनकारी उपाय शोधून काढणे हा या केंद्राच्या उभारणीमागील उद्देश आहे.
या सहयोगी संबंधाबद्दल बोलताना आयआयटी मुंबई या संस्थेचे संचालक सुभाशिष चौधुरी म्हणाले, “आमच्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्याने दाखवलेल्या औदार्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. त्यांच्या लक्षणीय योगदानामुळे जागतिक हवामानविषयक संकटावर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्याचे नेतृत्व करण्याप्रती आयआयटी मुंबईची कटिबद्धता पुन्हा एकदा दिसून आली आहे. या केंद्राच्या उभारणीतून अत्याधुनिक संशोधनाच्या माध्यमातून हवामानविषयक आव्हानांना तोंड देण्याप्रती, आंतरशाखीय सहयोगी संबंधांची जोपासना करण्याप्रती आणि उद्योजकीय प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याप्रती आमची निष्ठा अधोरेखित झाली आहे. हरित उर्जा आणि शाश्वतता संशोधन केंद्र म्हणजे भविष्यासाठी शाश्वत मार्गांची निर्मिती करण्यात सामुहिक प्रयत्न काय प्रभाव दाखवू शकतात याचा पुरावाच आहे.” ते पुढे म्हणाले, “एखादा परोपकारी माणूस निनावी राहू इच्छितो असे प्रसंग भारतीय शिक्षणक्षेत्रात क्वचितच घडतात. या देणगीमुळे, इतर अनेकांना आयआयटी मुंबईच्या कार्यात मदत करण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळेल अशी मला खात्री वाटते.”
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951851)
Visitor Counter : 117