माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्युरो-गोवा आणि गोवा सरकारचा सैनिक कल्याण विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या 'मेरी माटी, मेरा देश' मोहिमेअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 13 AUG 2023 4:59PM by PIB Mumbai

गोवा | ऑगस्ट 13, 2023

केंद्रीय संचार ब्युरो-गोवा (सीबीसी गोवा) आणि गोवा सरकारच्या सैनिक कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी, मेरा देश' अभियानांतर्गत आज बांबोळी, गोवा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

'मिट्टी को नमन, वीरों का वंदन' अशी टॅगलाईन असलेला हा उपक्रम भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जनसहभागाचा देशव्यापी कार्यक्रम आहे. 'मेरी माटी, मेरा देश' या मोहिमेने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ही मोहीम देशाच्या असंख्य कर्तृत्वाचा गौरव करते आणि आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या शूर वीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सीबीसी गोवाने युद्धातील विधवा आणि युद्धमातांच्या अपार बलिदानाची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. एकता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या 'हर घर तिरंगा' कार्यक्रमांतर्गत सुमारे 300 राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम, व्हीएसएम (निवृत्त) व्हाइस अ‍ॅडमिरल एस. के. दामले उपस्थित होते. सैनिक कल्याण विभागाचे सचिव कर्नल वेणुगोपाल नायर आणि सीबीसी गोवाचे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू उपस्थित होते.

'मेरी माटी, मेरा देश' अभियानात आपल्या पृथ्वीशी घट्ट नाते निर्माण करणे आणि आपल्या शूरांना आदरांजली वाहणे या उद्देशाने अनेक उपक्रमांचा समावेश आहे. शिलाफलकम चे लोकार्पण, पंच प्रण प्रतिज्ञा घेणे, वसुधा वंदनात देशी झाडांच्या 75 रोपांसह अमृत वाटिका तयार करणे, स्वातंत्र्यसैनिक व वीरांचा वीरों को वंदन देऊन सत्कार करणे, राष्ट्रध्वज फडकावणे व राष्ट्रगीत गायन करणे या उपक्रमांचा समावेश आहे.

देशभरातील गावांमधून गोळा केलेली माती ब्लॉक स्तरावर एकत्र आणली जाईल आणि शेवटी दिल्लीला नेली जाईल. प्रत्येक ब्लॉकमधील स्वयंसेवक कार्तव्य पथावर जमतील, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मातीचा वापर करून अमृत वाटिका बांधली जाईल.

'मेरी माटी, मेरा देशही मोहीम आपल्याला जोपासणाऱ्या भूमीप्रती असलेल्या बांधिलकीची आठवण करून देणारी आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्यांना भावपूर्ण आदरांजली आहे. गोव्यातील बांबोळी येथे झालेल्या या कार्यक्रमात या मोहिमेतील एकता आणि अभिमानाच्या भावनेचे सुंदर दर्शन घडले.

***

S.Thakur/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1948350) Visitor Counter : 140


Read this release in: English