संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे स्थित दक्षिण कमांड मुख्यालयाकडून पुणे छावणीचे जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये रुपांतर करण्याच्या प्रवासाला सुरुवात

Posted On: 11 AUG 2023 7:21PM by PIB Mumbai

पुणे, 11 ऑगस्ट 2023

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले अनोख्या  जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटाच्या काठावर, भारतीय लष्कराचे दक्षिणी कमांड मुख्यालय वसलेले आहे. पुणे छावणी ही  पुणे शहराच्या मध्यभागी असलेले निसर्ग आणि लष्करी वातावरण यांचे एक अद्वितीय मिश्रण असून हे या गजबजलेल्या शहराच्या फुफ्फुसाचे काम करते. शहरी वातावरण असूनही, छावणी परिसरात  थक्क करणाऱ्या  वनस्पती आणि प्राणी आहेत. हा परिसर पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचे सूक्ष्म जग म्हणून काम करतो.  पक्षी, फुलपाखरे आणि इतर वन्यजीवांसाठी आश्रयस्थान प्रदान करतो.  पुणे छावणीमध्ये  वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची उल्लेखनीय विविधता आहे, त्यापैकी अनेक या प्रदेशातील स्थानिक प्रजाती असल्यामुळे  त्यांच्या संवर्धनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुणे छावणीतील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने,दक्षिण कमांडने त्याचे जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये रूपांतर करण्याचा प्रवास सुरू केला आहे.

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे आणि त्यापैकी काही कार्यान्वित करण्यात आले  आहेत. सुरुवातीला पुणे छावणीमध्ये  एक अनोखा  वृक्षगणना आणि दस्तऐवजीकरण प्रकल्प राबवण्यात आला. त्याचबरोबर निवडक झाडांवर क्यूआर कोड असलेले फलक लावण्यात आले . यामुळे झाडांबद्दलची वैज्ञानिक माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाते आणि निसर्गाशी नाते जोडण्याची भावना देखील निर्माण करते  आणि शाश्वत जीवनामध्ये याची  महत्त्वपूर्ण भूमिका देखील आहे. उत्तम  संवर्धन धोरण तयार करण्यासाठी आणि पर्यावरणीय संरक्षणास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, या वृक्षगणनेने या प्रदेशातील वनस्पतींबद्दल महत्त्वपूर्ण माहिती  संकलित केली आहे. पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धन संस्था  (एसईबीसी ), पुणे आणि ट्रीज फॉर द फ्युचर (टीएफटीएफ ), रत्नागिरी येथील प्रशिक्षित तज्ञांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या प्रकल्पाची पुढील पायरी म्हणजे ‘तिरंगा बोगद्या’चे बांधकाम. राष्ट्रीय अभिमान जागृत करण्याचा आणि पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न म्हणून याची संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘तिरंगा बोगदा’ हा अशा प्रकारचा एक प्रकल्प आहे ज्याची रचना आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगांच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वनस्पतींच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. जैवविविधता प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांमध्ये जैवविविधता उद्यानांचा विकास, रेसकोर्समध्ये फुफ्फुसाच्या आकाराच्या उद्यानाची निर्मिती, वृक्षाच्छादित मार्गांची  निर्मिती, नक्षत्र उद्यानाची स्थापना आणि नैसर्गिक अधिवास आणि जलस्रोतांची पुनर्स्थापना यांचा समावेश असेल.

‘तिरंगा बोगदा’ तयार करण्याच्या या प्रयत्नात, दक्षिण कमांडने पुणे महानगरपालिकेशी (पीएमसी) सहकार्य केले आहे जे पुण्याच्या अनन्यसाधारण जैवविविधतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देत आहे. आरोग्य आणि तंदुरुस्तीचा प्रचार करण्यासाठी वचनबद्ध एक अग्रगण्य वेलनेस ब्रँड हिमालया वेलनेस कंपनी आणि पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धन संस्था (एसईबीसी) गेल्या काही वर्षांपासून जैवविविधता संवर्धन उपक्रमांना सहाय्य  करत आहे.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1947944) Visitor Counter : 150


Read this release in: English