जलशक्ती मंत्रालय

दिल्ली येथील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांमध्ये गोव्यातील ‘हर घर जल’ योजनेच्या लाभार्थ्यांची निवड


सरकारच्या ‘जन भागीदारी’ या संकल्पनेला अनुसरून, देशभरातील सर्व स्तरातील नागरीक लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात होणार सहभागी

Posted On: 11 AUG 2023 12:27PM by PIB Mumbai

दिल्ली/गोवा, 11 ऑगस्ट 2023

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी तसेच पंतप्रधानांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांना दिल्ली येथे बोलावण्यात आले आहे. या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे  सरपंच,  शिक्षक,  परिचारिका, शेतकरी, मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी उपक्रमाचे लाभार्थी आणि यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

गोव्यातून कुडचडे येथील हर घर जल योजनेचे लाभार्थी योगेश पार्सेकर आणि दर्शना पार्सेकर आणि धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे येथील माया आर्सेकर आणि समीर आर्सेकर यांना दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष आमंत्रणाबद्दल लाभार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

हर घर जल मोहिमेच्या माध्यमातून नळजोडणी मिळाल्यामुळे दिवसाचे किमान दोन तास वाचल्याचे माया आर्सेकर आणि समीर आर्सेकर सांगतात. केवळ वेळच नाही तर दुरुन पाणी आणण्याचे श्रमही वाचले आहेत, अशी प्रतिक्रिया आर्सेकर दाम्पत्याने दिली. पाण्याच्या मोठ्या संकटातून आणि त्रासातून सुटका केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कुडचडे येथील योगेश पार्सेकर यांनी सांगितले की, त्यांचे आईवडील भल्या पहाटे उठून पाण्यासाठी त्रास काढत असत. हर घर जल योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला आता घरात पाणी मिळत असून यामुळे कुटुंबाचे श्रम वाचल्याचे त्यांनी सांगितले.

 

सरकारच्या जन भागीदारीया संकल्पनेनुसार देशभरातील सर्व स्तरातील नागरिकांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित म्हणून उत्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये गोवा हे देशातील पहिले हर घर जलप्रमाणित राज्य बनले आहे. गोव्यातील सर्व 2.63 लाख ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

***

PIBGOA | SThakur | DY

Follow us on Social Media:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1947660) Visitor Counter : 97


Read this release in: English