सांस्कृतिक मंत्रालय
गोव्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'मेरी माटी, मेरा देश' अभियान राबवणार
अमृत वाटिका उभारणीसाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून दिल्लीला माती नेण्यात येणार
Posted On:
08 AUG 2023 8:38PM by PIB Mumbai
पणजी, 8 ऑगस्ट 2023
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' मोहिमेचा समारोप म्हणून 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण गोव्यात 'मेरी माटी, मेरा देश' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहणाऱ्या या अभियानांतर्गत 9 ते 25 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतस्तर, तालुकास्तरीय व जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाने या मोहिमेची सांगता होणार आहे.
'मेरी माटी, मेरा देश' या मोहिमेचा उद्देश देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या या नि:स्वार्थी व्यक्तींप्रती आपली सामायिक कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे आहे. गोव्यात पंचायत संचालनालयाच्या देखरेखीखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून माती संकलित करण्यात येणार असून, देशाच्या एकात्मतेचे आणि जमिनीशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे. प्रत्येक पंचायतीकडून संकलित केलेली माती 14 तालुकास्तरीय कार्यालयांना सुपूर्द करण्यात येणार आहे. पणजी येथे 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय कार्यक्रमानंतर नेहरू युवा केंद्राचे 14 युवा स्वयंसेवक राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांतर्गत माती दिल्लीला घेऊन जाणार आहेत. देशभरातून गोळा करण्यात आलेल्या मातीचा वापर राष्ट्रीय राजधानीत 'अमृत वाटिका' नावाची खास वाटीका तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
या अभियानांतर्गत देशभरात स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, ध्वजारोहण, शपथ घेणे असे कार्यक्रम होणार आहेत. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्थानिक वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत स्मारक (शिलाफलकम) उभारण्यात येणार आहे. शिवाय, शाश्वततेसाठी आपली बांधिलकी दर्शविणारी प्रत्येक ग्रामपंचायत 75 वृक्ष लागवडीत सहभागी होणार आहे.
शिक्षणखाते, पोलीस विभाग, नागरी पुरवठा, वनविभाग या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत सरकारने 12 मार्च 2021 रोजी साबरमती ते दांडी या मोर्चाद्वारे "आझादी का अमृत महोत्सव" मोहीम सुरू केली होती. दोन वर्षांच्या या प्रवासात या मोहिमेला मोठ्या प्रमाणात लोकसहभाग लाभला आहे. आझादी का अमृतत महोत्सव मोहिमेचा एक भाग म्हणून 1.9 लाखांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'मेरी माटी, मेरा देश' या मोहिमेची संकल्पना 'आझादी का अमृत महोत्सवा'चा समारोप म्हणून करण्यात येत आहे.
PIB Panaji/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1946866)
Visitor Counter : 136