शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जमशेटजी टाटा यांच्या योगदानाची महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केली प्रशंसा



मुंबई विद्यापीठ, विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 'जमशेटजी टाटा: अनसंग हिरो ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल' या विषयावर परिसंवाद आयोजित

Posted On: 08 AUG 2023 2:41PM by PIB Mumbai

मुंबई, 8 ऑगस्ट 2023

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने, मुंबई विद्यापीठ आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात 'जमशेटजी टाटा: अनसंग हिरो ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल' या विषयावर एका परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, सीएसआयआरचे माजी महासंचालक आणि विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शेखर मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा.अजय भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, महाराष्ट्राचे राज्यपाल, रमेश बैस यांनी जमशेदजी टाटा यांचे वर्णन 'आत्मनिर्भर भारताचे' आद्य पुरस्कर्ते असे केले. टाटा समूहाची पायाभरणी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांची निर्मिती केल्याबद्दल प्रशंसा करून राज्यपालांनी जमशेदजी टाटा यांना आदरांजली वाहिली. कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने  शिक्षणात अनुरूप बदल करावे लागतील तसेच कौशल्य शिक्षण व कौशल्य अद्ययावतीकरण करण्यासाठी योजना आखावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी निव्वळ व्यापारी मानसिकता न ठेवता उद्यमशीलतेच्या मानसिकतेला प्राधान्य दिले, त्यामुळे नीतिमत्ता व मूल्यांवर आधारित एका प्रगत समाजाची निर्मिती झाली, असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले.  

स्वामी विवेकानंद व जमशेदजी टाटा यांनी विज्ञानाला प्रोत्साहन दिले असे विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शेखर मांडे यांनी सांगितले. यावेळी डॉ मांडे यांनी टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'विद्यार्थी विज्ञान मंथन' परीक्षा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.  

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946639) Visitor Counter : 115


Read this release in: English