वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हातमाग दिन : एनआयएफटी मुंबई या संस्थेतर्फे भारतीय हातमागाच्या वस्त्रांवर आधारित ‘हस्तवम्’ या प्रदर्शनाचे आयोजन


‘हस्तवम्’ हे प्रदर्शन जनतेसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत खुले

Posted On: 07 AUG 2023 8:17PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑगस्ट 2023

 

हातमाग दिन हा दिवस या पुरातन कलेचे जतन करणाऱ्या आणि आजही स्वतःच्या हाताने अनोखी वस्त्रे विणण्याचे कार्य सुरु ठेवणाऱ्या कुशल कारागिरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारतीय हातमागांच्या भव्यतेचा आणि त्यांच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्याप्रती समर्पित केलेला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यासाठी एनआयएफटी मुंबई या संस्थेने त्यांच्या खारघर येथील परिसरात ‘हस्तवम्’ या भारतीय हातमागाच्या वस्त्रांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले.

भारतीय हातमागांचा उत्सव असलेल्या ‘हस्तवम्’ या प्रदर्शनात एनआयएफटी मुंबईतील शिक्षकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि संसाधन केंद्रातर्फे हातमागावर विणलेल्या 60 वस्तूंचा उल्लेखनीय संग्रह सादर करण्यात आला आहे.मनमोहक ईशान्य प्रदेशासह भारतातील विविध राज्यांमध्ये तयार होणाऱ्या हातमागावरील तसेच भरतकाम केलेल्या कपड्यांचा आजच्या या प्रदर्शनात समावेश आहे. या वस्त्रांचा प्रत्येक धागा, संरेखन आणि विशेष कलाकृती आपल्या देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक वस्त्रभांडाराची साक्ष देत होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन डब्ल्यूआयसीसीआय महाराष्ट्र हातमाग मंडळाच्या अध्यक्ष तसेच वस्त्र संशोधक, लेखक आणि क्युरेटर सविता सुरी आणि शिक्षणतज्ञ भामिनी सुब्रमण्यम् यांच्या हस्ते  झाले. भामिनी सुब्रमण्यम् रचनाविषयक विचारवंत असून त्यांच्याकडे वस्त्रे संरेखन, फॅशन, अंतर्गत सजावट आणि उत्पादन संरेखन या व्यवसायाचा  35 वर्षांचा अनुभव आहे.

‘हस्तवम्’ या प्रदर्शनाची संकल्पना एनआयएफटीच्या माजी प्रमुख आणि संरेखन विभागातील शिक्षक प्रा.शर्मिला दुआ आणि एनआयएफटी मुंबई येथील वस्त्र संरचना विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.रीना अगरवाल यांनी मांडली. त्यांचे समर्पण आणि तज्ञता यांनी या नेत्रदीपक सोहोळ्याच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.  

विविध वस्त्रांच्या सादरीकरणासोबतच या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या देशात पिढ्यापिढ्यांपासून चालत आलेल्या कलेला या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाद  देण्यात आली. केवळ धाग्यांच्या विणीत जिवंतपणा निर्माण करून त्यांच्यात आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा सुगंध भरण्याच्या कलाकारांच्या क्षमतेचा हा उत्सव आहे.

एनआयएफटी मुंबईने आयोजित केलेले हे प्रदर्शन साध्यासुध्या धाग्यांपासून निर्माण होऊ शकणाऱ्या जादुई वस्तूंची आठवण करून देते आणि परंपरा तसेच समकालीन अभिव्यक्ती यांच्या सुगम एकत्रीकरणाची प्रशंसा करून आणि आपल्या देशाच्या समृध्द वारशाच्या परंपरेचा स्वीकार करून हातमाग कलेचा सन्मान करण्याची प्रेरणा देते.   

‘हस्तवम्’  या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, पंजाब, ओदिशा, गुजरात, राजस्थान, बिहार,  झारखंड, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल,तामिळनाडू, तेलंगणा,आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध राज्यांमध्ये तयार होणारी हातमागाची वस्त्रे मांडण्यात आली आहेत. महाराष्ट्रात हातमागावर तयार केल्या जाणाऱ्या, सोलापुरी वॉल हँगिंग, हिमरू, करवत काठी, पैठणी तसेच खण इत्यादी उत्पादनांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

‘हस्तवम्’ हे प्रदर्शन जनतेसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत खुले राहणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946523) Visitor Counter : 123


Read this release in: English