रेल्वे मंत्रालय
अमृत भारत स्थानक योजना: प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांसह मध्य रेल्वेच्या 76 रेल्वे स्थानकांमध्ये वाढविणार पायाभूत सुविधा
रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग या तीन उपनगरीय स्थानकांवर ‘स्टेशन अपग्रेड’ कामाचा होणार शुभारंभ
Posted On:
04 AUG 2023 9:44PM by PIB Mumbai
मुंबई, 4 ऑगस्ट 2023
देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्यात येणार आहे. रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होणार आहे. या योजनेमुळे प्रवाशांना एकूणच उत्तम, सुखकर प्रवासाचा अनुभव येईल. अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोणातून स्थानकांचा निरंतर विकास केला जाणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी अमृत भारत स्थानक योजनेविषयी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पायाभरणी करण्याच्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना त्यांनी सागितले की, अमृत भारत स्थानक योजनेत मध्य रेल्वेची 76 रेल्वे स्थानकांच्या श्रेणीत सुधारणा किंवा त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यापैकी 38 स्थानकांवर पायाभरणी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या अमृत भारत स्थानक योजनेमध्ये स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आराखडा तयार करणे आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. स्थानकात प्रवेश सुकर करणे, स्थानक परिसर क्षेत्र्त्राचा विकास, प्रतीक्षालय( वेटिंग रूम), स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्कलेटर, स्वच्छता व्यवस्था, मोफत वाय -फाय, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्र, यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन 'एक स्थानक एक उत्पादन', प्रवाशांना माहिती देण्यासाठी उत्तम प्रणाली, ‘एक्झिक्युटिव्ह लाउंज’, व्यवसायिक बैठकीसाठी निश्चित जागा, स्थानकाच्या सौदर्यामध्ये भर घालणारी रचना अशा विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेत इमारतीमध्ये सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकावर येणे सुकर जावे यासाठी सुविधा केली जाईल. ‘मल्टीमॉडल इंटिग्रेशन’, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, येण्या- जाण्यासाठी प्रशस्त ट्रॅकची तरतूद केली जाणार आहे; तसेच आवश्यकतेनुसार 'रूफ प्लाझा' तयार करण्यात येणार आहेत. स्थानक सुधारणा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आणि व्यवहार्यता लक्षात घेवून, दीर्घकालीन उपक्रम म्हणून राबविण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे, याची माहिती जाणून घेवूया.
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या 76 स्थानकांना अद्ययावत करणे किंवा पुनर्विकास केला जाईल.
मुंबई विभाग - भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड
पुणे विभाग -कोल्हापूर, हडपसर, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, तळेगाव, हातकणंगले, आकुर्डी, बारामती, देहूरोड, केडगाव, उरुळी, लोणंद, वाठार, फलटण
नागपूर विभाग - बल्हारशाह, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अमला, नरखेल, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, घोराडोंगरी, गोधनी
भुसावळ विभाग - बडनेरा, मलकापूर, मूर्तिजापूर, नेपानगर, शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा
सोलापूर विभाग - सोलापूर, कलबुर्गी, दौंड, पंढरपूर, वाडी, कुर्डुवाडी, अहमदनगर, कोपरगाव, लातूर, शहाबाद, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी, उस्मानाबाद, जेऊर
अमृत भारत स्थानक योजनेच्या माध्यमातून मुंबईतील 15 उपनगरीय स्थानके सुधारित आणि पुनर्विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत. या स्थानकांमध्ये प्रवास सुलभीकरण आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करणे समाविष्ट आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिली. अमृत भारत स्थानक योजनेद्वारे मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांचा कायापालट करण्याच्या दिशेने प्रवास म्हणजे प्रवाशांच्या प्रगती, सोय आणि उज्ज्वल भविष्यासाठी रेल्वेची वचनबद्धता असल्याचेही ते म्हणाले. ही योजना जसजशी विकसित होत जाईल तसतसे अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत कायापालट होत असलेली स्थानके एका समृद्ध मुंबई शहराच्या आकांक्षीत पायाभूत सुविधा आणि संपर्क सुविधा यांचे सुसंवादी मिश्रण प्रतिबिंबित करतील. यामुळे पुढील उन्नत सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल:
- आकर्षक स्थानक इमारत: स्थानकाची नवीन इमारत स्थापत्यशास्त्रीय वैशिस्थ्याना परिभाषित करेल तसेच आधुनिक आणि आकर्षक परिसर प्रतिबिंबित करेल.
- स्वच्छ भारतावर लक्ष केंद्रित: स्वच्छ भारत मिशनला अनुसरून स्थानकात एक मॉड्यूलर सांडपाणी प्रक्रिया संयंत्र सुरू करेल. ही सुविधा कार्यक्षम सांडपाणी प्रक्रिया आणि स्वच्छ परसर सुनिश्चित करेल.
- फलाटांचे सौंदर्यीकरण: भिंतींवर मनमोहक भीत्तीचित्रे काढून फलाटांचे पुनरुत्थान आणि सौंदर्याचा उन्नती साधली जाईल.
- प्रवाशांसाठी सुविधा: प्रवाश्यांना आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि फलाटावर तसेच स्थानकाच्या इमारतीत भरपूर प्रकाश आणि वायुवीजन यासह सुधारित सुविधांचा आनंद मिळेल.
- वर्धित संपर्क सुविधा: एक सुधारित फूट ओव्हर ब्रिज, अतिरिक्त लिफ्ट आणि सरकता जिना या सुविधांनी प्रवाशांची ये जा सुलभ करेल.
- मार्गदर्शन आणि माहिती: आधुनिकीकृत ट्रेन इंडिकेशन बोर्ड आणि प्रवासी-अनुकूल चिन्हे स्थानक परिसरात अखंड नेव्हिगेशन सुलभ करून देतील.
- कार्यात्मक सुधारणा: विद्यमान बुकिंग कार्यालय आणि इतर प्रशासकीय इमारतींचे संपूर्ण नूतनीकरण केले जाईल तसेच त्यांना योजनेच्या व्यापक दृष्टीकोनासह संरेखित केले जाईल.
- सर्वसमावेशकता: सर्व सुधारणा सर्वांसाठी समान उपलब्धता आणि सुविधा सुनिश्चित करून दिव्यांगजन (विशेष-सक्षम) अनुकूल बनवल्या जातील
* * *
PIB Mumbai | JPS/Suvarna/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945947)
Visitor Counter : 277