संरक्षण मंत्रालय
मुंबईत ड्युरंड चषक टूर आयोजित
Posted On:
08 JUL 2023 5:55PM by PIB Mumbai
मुंबई, 8 जुलै 2023
क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ड्युरंड चषक फूटबॉल स्पर्धेच्या आगामी 132 व्या स्पर्धेनिमित्त, मुंबईत आज म्हणजेच 8 जुलै 2023 रोजी मोठ्या उत्साहात ट्रॉफी टूर (चषक फेरी) आयोजित केली होती. यानिमित्त, कुलाबा इथल्या आर्मी ऑफीसर्स इन्स्टिट्यूट इथे तीन भव्य ड्युरंड चषकांचे स्वागत करण्यात आले. या समारंभाला पश्चिम नौदल विभागाचे ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ, व्हाईस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, आणि लेफ्टनंट जनरल एचएस कहलॉन, जीओसी, एचक्यू एमजी आणि जी एरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कुलाबा इथून ह्या चषकांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. त्यानंतर, ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह इथे त्यांना प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले होते.
यावेळी बोलताना, लेफ्टनंट जनरल एचएस काहलॉन म्हणाले, "प्रतिष्ठित ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या उत्सवात सहभागी होणे ही खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. भारतीय लष्कर कदाचित जगातील सर्वात मोठी क्रीडा प्रोत्साहक संस्था असेल, जागतिक स्तरावर भारतीय लष्कराच्या खेळाडूंची प्रशंसा झाली आहे. लष्करातील खेळाडू, संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणा आणि अभिमानाचा स्रोत आहेत. ड्युरंड चषक, फुटबॉलसाठीच्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच भारतीय फुटबॉल संघ एक भव्य उंची गाठेल. भारतीय लष्कर आणि फुटबॉल संघाला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या 132 व्या ड्युरंड चषक स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.”

या स्पर्धेसाठीचे तीन चषक आहेत, ड्युरंड चषक (एक फिरता चषक आणि मूळ पारितोषिक ), शिमला चषक (हा ही एक फिरता चषक. 1904 मध्ये शिमल्याच्या रहिवाशांनी पहिल्यांदा दिला) आणि प्रेसिडेंट कप (पहिल्यांदा डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1956 मध्ये प्रदान).
BYM4.jpeg)
याआधी, 30 जून 2023 रोजी ह्या चषकांना लष्करप्रमुख, हवाई दलप्रमुख आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांनी नवी दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून 17 शहरात परिक्रमा करण्यासाठी रवाना केले. हा चषक डेहराडून, उधमपूर आणि पुणे इथे जाऊन आल्यानंतर मुंबई हा या दौऱ्यातील पाचवा मुक्काम आहे. 01 ऑगस्ट 2023 रोजी कोलकातामध्ये ध्वजांकित करण्यापूर्वी या दौर्यामध्ये जयपूर, कारवार, कोची, एझिमाला, बेंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी, कोक्राझार, शिलाँग आणि आयझॉल यांचा समावेश आहे.

132 वी ड्युरंड चषक स्पर्धा 3 ऑगस्ट 2023 पासून कोलकाता इथे सुरू होणार असून 3 सप्टेंबर 2023 ला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. ड्युरंड चषक स्पर्धेत एकूण 24 संघ असतील. आधीच्या स्पर्धेतील 20 संघ यावेळीही कायम आहेत, ज्यात ज्यात सर्व 12 इंडियन सुपर लीग (ISL) संघांचा समावेश आहे. त्याशिवाय, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ या शेजारी देशांतील संघ देखील सहभागी होणार असून 27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर परदेशी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938187)
Visitor Counter : 131