सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

एनएसएसओ -एफओडी मुंबईच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमात भारतीय मुख्य सांख्यिकी अधिकारी सहभागी


‘प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन’, ‘घरगुती कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट’, ‘कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण’ आणि “कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती’ अशा विषयांवर तज्ञांची भाषणे

Posted On: 06 JUL 2023 7:14PM by PIB Mumbai

मुंबई, 6 जुलै 2023

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव आणि भारताचे मुख्य सांख्यिकी तज्ञ, डॉ. जी. पी. सामंता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबईच्या एनएसएसओ म्हणजेच राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण कार्यालयात ‘स्वच्छता पंधरावड्याचे’ आयोजन करण्यात आले होते. डॉ. सामंता यांच्या उपस्थितीमुळे सर्व अधिकाऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यास अधिक उत्साह आला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत, केंद्र सरकारच्या स्वच्छता आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागातर्फे, 1 जुलै 2023 ते 15 जुलै 2023 दरम्यान, स्वच्छता पखवाडा म्हणजे स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मुंबईच्या एनएसएसओ (एफओडी) प्रादेशिक कार्यालयाने ‘पर्यावरण रक्षणासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन’ या विषयावर आज  एका कार्यशाळेचेही आयोजन केले होते.

स्वच्छता आपल्याला, अभिमान आणि आत्मसन्मानाची जाणीव करुन देते, असे विचार डॉ. सामंता यांनी व्यक्त केले. स्वच्छतेमुळे केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही उत्तम राखता येते. त्यामुळे स्वच्छतेचा नियम हा केवळ 15 दिवसांसाठीचा उपक्रम म्हणून नाही, तर नियमितपणे आपले कर्तव्य म्हणून पाळला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असून, केवळ घरी किंवा कार्यालयातच नाही, तर सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छतेचे नियम पाळले जावेत. ‘स्वच्छता पंधरवडा’ हा आपल्या सर्वांना एकत्रित आणून, परिसरात लक्षणीय बदल घडवणारा एक मंच आहे, असेही ते पुढे म्हणाले. आपली जबाबदारी केवळ आपल्या चार भिंतींपुरतीच मर्यादित नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिसराप्रती देखील आहे. स्वच्छता केवळ एक सुनियोजित समाजाचे प्रतिबिंब नाही, तर एका निरोगी, सुदृढ समाजाचेही प्रतिबिंब आहे, असेही डॉ. सामंता म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानातील मुख्य उद्देश, लोकांमध्ये स्वच्छतेविषयीची जागृती निर्माण करुन, त्यांना अधिक स्वच्छतेसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. त्या दृष्टीने, ही मोहीम, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सर्व कार्यालयांमधे राबवली जात असून, त्याद्वारे लोकांमध्ये, स्वच्छते विषयी जनजागृती केली जात आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विक्रांत भालेराव यांनी यावेळी ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ या विषयावर सादरीकरण करून प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती, अशा कचऱ्याचे धोके आणि सुरक्षित विल्हेवाट याविषयी माहिती दिली. वाढती लोकसंख्या आणि जलद औद्योगिकीकरणामुळे कचऱ्याचे पुनर्वापर/विलगीकरण करण्यावर त्यांनी भर दिला. भारतात, संघटित आणि असंघटित कंपन्या/उद्योगांद्वारे कचरा व्यवस्थापन पद्धतशीरपणे केले गेले आणि प्रक्रियेत रोजगार आणि संसाधने निर्माण केली गेली, असे त्यांनी सांगितले.

घरगुती कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि महानगरपालिकेद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी  सविस्तर माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापनावर चर्चा  केंद्रित करत त्यांनी सुका  कचरा, ओला कचरा आणि इतर धोकादायक कचरा अशा तीन प्रकारच्या कचऱ्याच्या संकलनाची माहिती दिली.  पुढील वापराच्या दृष्टीनं ओल्या कचऱ्याचे  खतामध्ये  रूपांतर केले जाते आणि भविष्यात, 2050 पर्यंत कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करणारे  ऊर्जा प्रकल्प उभारण्याची संबंधित प्राधिकरणाची योजना आहे, असे त्यांनी नमूद केले.त्याचवेळी, ई-वाहनांच्या वापराला  प्रोत्साहन देणे इत्यादी काही कौतुकास्पद पावले उचलून सरकार हवेची गुणवत्ता सुधारण्याचे काम करत आहे, अशी माहिती त्यांनी  दिली.2022 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका भारतातील स्वच्छ शहरांमध्ये तिस-या क्रमांकावर होती आणि या वर्षी या अभियानामध्ये  प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी या  महानगरपालिकेने दृढ निर्धार केला असून या दिशेने  वेगाने काम सुरु आहेअसे ते म्हणाले

मुंबई कचरा व्यवस्थापनाचे संचालक सोमनाथ मलगर यांनी कचरा प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले.त्यांनी कचरा व्यवस्थापनाच्या विविध पैलूवर भर दिला आणि वाढत्या औद्योगिक प्रदूषणामुळे आणि वर्षानुवर्षे  मोठ्या प्रमाणात वापर वाढल्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. देवनार प्रकल्पाचे प्रमुख अयाज हुसेन यांनी पुर्न -शाश्वतताया विषयावर जनजागृती करण्यासाठी ‘कचऱ्यापासून ऊर्जा’ या विषयावर सविस्तर सादरीकरण केले.

मुंबईच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या  (एफओडी) उपमहासंचालक  यांनी स्वागतपर भाषण केले आणि भारत सरकारच्या धोरण आणि नियोजनासाठी, मोठ्या प्रमाणावर एस . ई सर्वेक्षण करणाऱ्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या   (एफओडी) स्वच्छता पंधरवड्याची माहिती दिली. सीजीओ संकुल , सीबीडी  बेलापूर येथील कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेचे  (एफओडी)   सुमारे 120 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

 

S.Bedekar/R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1937819) Visitor Counter : 119


Read this release in: English