युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

नेहरू युवा केंद्राद्वारे कोल्हापूर इथे आयोजित युवा उत्सवाची यशस्वी सांगता


केंद्रीय लोकसंपर्क विभागाने प्रकाशन विभागाच्या मदतीने स्थापन केलेल्या बुक स्टॉलला लोकांचा उदंड प्रतिसाद

Posted On: 06 JUL 2023 5:26PM by PIB Mumbai

कोल्हापूर, 6 जुलै 2023

नेहरू युवा केंद्र, कोल्हापूरने विवेकानंद महाविद्यालयात आयोजित केलेल्या युवा उत्सवाची आज यशस्वी सांगता झाली. या उत्सवात, विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेत, विविध स्पर्धा आणि कार्यक्रमातून आपल्या कलाकौशल्याची चुणूक दाखवली.

डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. आपण योग्य दिशेने वाटचाल केली तर समाज आणि पर्यावरणासाठी त्याचे सकारात्मक परिणाम निश्चित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा उत्सवातकेंद्रीय लोकसंपर्क विभागाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रकाशन विभागाच्या सहकार्याने पुस्तकांचा स्टॉल लावला होता. या स्टॉलमध्ये विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके आणि मासिके प्रदर्शित करण्यात आली होती, यातून सहभागी विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन आणि दूरदृष्टी मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘न्यू इंडिया समाचार’ ह्या पथदर्शी पक्षिकाचे देखील विद्यार्थ्यांमधे वितरण करण्यात आले, या मासिकात केंद्र सरकारची प्रगती आणि त्यांच्या उपलब्धी, याविषयी माहिती दिलेली असते.

यावेळी उत्सवात सहभागी युवकांनी, पुस्तके आणि मासिकांच्या विविधांगी संग्रहांमध्ये रस घेतला, ज्यातून त्यांची ज्ञानजिज्ञासा आणि माहिती मिळवण्याचा उत्साह दिसून आला. त्याशिवाय, केंद्र सरकारच्या केंद्रीय लोकसंपर्क विभागाने कापडी पिशव्या वितरित करत, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देऊन, आपली पर्यावरणाप्रतीची जबाबदारी पार पाडली.

नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना त्यांची कला आणि कौशल्ये दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होत. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे नवोन्मेष केंद्र (सेंटर फॉर इनोव्हेशन), इनक्युबेशन अँड लिंकेजेस (एससीआयआयएल), एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एसयूकेआरडीएफ), जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, सामाजिक न्याय आणि कल्याण विभाग, बँक ऑफ इंडिया , LIDCOM, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, दिव्यांग महामंडळ, आणि श्रील सूर्या रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड अशा विविध संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विवेकानंद महाविद्यालयात आयोजित ह्या युवा उत्सवाने यशस्वीपणे तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. हा कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्यासोबतच, प्रकाशनांमधून शिकण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून अत्यंत उपयुक्त ठरला.

 

  S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1937780) Visitor Counter : 149


Read this release in: English