खाण मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था अजिंठा येथे भू-वारसा शिबिराचे करणार आयोजन
केंद्रीय कोळसा व खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते होणार शिबिराचे उद्घाटन
Posted On:
05 JUL 2023 5:29PM by PIB Mumbai
मुंबई, 5 जुलै 2023
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) संस्था 7 जुलै 2023 रोजी अजिंठा लेणी येथे भू-वारसा शिबिराचे आयोजन करत आहे. हे शिबीर, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून देशभरातली आकर्षक भू- वारसा स्थळे सर्वांसमोर आणण्याच्या अभियानाचा एक भाग आहे. या माध्यमातून या स्थळांचे महत्त्व आणि भावी पिढ्यांकरिता अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यांचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित करणे, हे जीएसआयचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, सकाळी 11 वाजता, श्री राम मंदिर संस्थान सभागृह, अजिंठा येथे भू-वारसा शिबिराचे उद्घाटन करतील. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, पर्यटक आणि पत्रकारांना सहभागी करून घेण्यासाठी आखण्यात आलेल्या अनेक जागृतीपर कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. भावी पिढ्यांच्या लाभासाठी भारताचा भू-वारसा जतन करण्याचे महत्त्व ते आपल्या भाषणातून उपस्थितांसमोर मांडतील. अजिंठा लेणी, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेल्या या लेण्यांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात राज्य सरकार आणि खाजगी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत खाण मंत्रालय आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मधील वरिष्ठ मान्यवरांचा सक्रिय सहभाग असेल. हे सामूहिक प्रयत्न भारताच्या समृद्ध भूशास्त्रीय वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त वचनबद्धता अधोरेखित करतात.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा:
सुजित कुमार त्रिपाठी
संचालक आणि जनसंपर्क अधिकारी
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण
केंद्रीय मुख्यालय
कोलकाता-700016
संपर्क क्रमांक- 9432363977
pro@gsi.gov.in
भू-वारसा स्थळांविषयी -
भारताला वैविध्यपूर्ण वारसा लाभला आहे. यामध्ये केवळ स्थापत्यकलेतील आश्चर्य वाटाव्यात अशा वास्तूच नाही तर भूवैज्ञानिक स्मारके आणि अत्यंत सुंदर भूप्रदेशांचाही समावेश आहे. भू-वारसा स्थळे म्हणून ओळखल्या जाणारी ही नैसर्गिक आश्चर्ये भूगर्भीय प्रक्रियांचा दाखलाच असून ती बहुमोल आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या स्थळांचे जतन करण्याचे अभिमानास्पद काम करत आहे.अशा स्थानांपैकी 92 स्थळे चिन्हीत केली आहेत.त्यापैकी काही स्थानांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणून मान्यता दिली आहे. ‘जीएसआय’ च्यावतीने भू-वारसा स्थळ पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाते आणि आगामी पिढ्यांसाठी हा भूवैज्ञानिक खजिना,जतन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणविषयी -
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) ची स्थापना 1851 मध्ये झाली. रेल्वेसाठी कोळशाचे साठे शोधण्याच्या प्राथमिक उद्देशाने या संस्थेची स्थापन करण्यात आली होती. आज भू-विज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था म्हणून विकसित झाली आहे. देशातील महत्त्वपूर्ण भूवैज्ञानिक माहितीचे भांडार म्हणून ही संस्था काम करत आहे. सर्वेक्षण, खनिज मूल्यांकन आणि बहु-शाखीय अभ्यास संस्थेमार्फत केला जातो. जीएसआयचे लक्ष्य व्यावसायिक आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयांना मदत करण्यासाठी निष्पक्ष भूवैज्ञानिक कौशल्य आणि अद्ययावत माहिती प्रदान करण्यावर आहे. संस्था महत्वाच्या खनिजांचा शोध, भूस्खलनाविषयी पूर्व इशारा देणाऱ्या प्रणालीची स्थापना आणि अवकाशीय डेटाबेस आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सर्वेक्षण क्षमता वाढवणे याला प्राधान्य देते. संस्थेचे कोलकाता येथे मुख्यालय आहे तसेच देशभरात प्रादेशिक कार्यालये आहेत. जीएसआय भू वैज्ञानिक माहिती आणि अवकाशविषयक डाटा यांचा प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी भू-इन्फोर्मटिक्स क्षेत्रातील भागधारकांशी समन्वय साधला जातो. खाण मंत्रालयाशी संलग्न कार्यालय असल्याने जीएसआय भारताच्या खनिज संसाधनांचे मूल्यांकन आणि भूगर्भीय संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
N.Chitale/S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937559)
Visitor Counter : 122