विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी 20 देशांनी जगासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी मतभेदांपलीकडे जाऊन विचार करण्याचे आणि आपण एक कुटुंब आहोत या भावनेने जागतिक कल्याणासाठी कार्य करण्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे आवाहन


भारत आपल्या काळातील गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाचे आदानप्रदान यांचे महत्त्व भारत जाणत असल्याचे मुंबईत जी 20 देशांच्या संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत स्वागतपर भाषण करताना डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

जी 20 देशांनी स्वच्छ ऊर्जा स्रोतांच्या दिशेने संक्रमण घडवून आणण्यासाठी पर्यावरणीय नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञान आणि अभिनवतेच्या शक्तीचा उपयोग केला पाहिजे

जी -20 समुदायाने चक्रीवादळ, त्सुनामी, भूस्खलन, वणवे यासारख्या विविध नैसर्गिक धोक्यांचा अंदाज वर्तवण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी जी -20 मध्ये नसलेल्या देशांसाठीही तंत्रज्ञान सामायिक केले पाहिजे : डॉ जितेंद्र सिंह

जग जलद डिजिटल परिवर्तनाचे साक्षीदार होत असताना, सायबर-सुरक्षा महत्त्वाची ठरत असून हॅकर्सना भेदणे कठीण होईल असे अल्गोरिदम विकसित करण्याचे जितेंद्र सिंह यांचे आवाहन

क्वांटम तंत्रज्ञान विकसित करणे, क्वांटम कम्युनिकेशन शोध, क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम अल्गोरिदम हे पुढील जी -20 संशोधन कार्यक्रमपत्रिकेवर : डॉ जितेंद्र सिंग

Posted On: 05 JUL 2023 1:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई, 5 जुलै 2023

जी 20  देशांनी  जगासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी  मतभेदांपलीकडे जाऊन  विचार करण्याचे  आणि आपण  एक कुटुंब आहोत या  भावनेने जागतिक कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी जी 20 देशांना केले आहे.

मुंबईत जी 20 देशांच्या संशोधन मंत्र्यांच्या बैठकीत स्वागतपर भाषणात ते बोलत होते.  आपल्या काळातील गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग आणि ज्ञानाचे आदानप्रदान यांचे महत्त्व भारत जाणत असल्याचे  प्रतिपादन सिंह यांनी यावेळी केले.

जग हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास या आव्हानांना तोंड देत असताना, अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा कार्यक्षमतेने वापर करणे अत्यावश्यक बनले आहे, असे सिंह यांनी सांगितले.  जी -20 सदस्यांनी  निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन  उद्दिष्टांसाठी वचनबद्ध राहून शाश्वत विकास आणि अक्षय ऊर्जेसंदर्भात  काम करत राहावे यावर त्यांनी भर दिला.  जगात अलिकडच्या वर्षांत सौर आणि पवन ऊर्जा संस्थापित करण्यात  भरीव वाढ झाल्याबाबत त्यांनी  समाधान व्यक्त केले.  ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडून ते  स्वच्छ, अधिक परवडणारे आणि सर्वांसाठी सुलभ होईल, अशी  सामग्री शोधण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ अथक परिश्रम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

जी 20 राष्ट्रांनी स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे संक्रमण घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान व अभिनवतेच्या  शक्तीचा उपयोग केला पाहिजे आणि स्मार्ट ग्रिड, ऊर्जा-कार्यक्षम इमारती व  शाश्वत वाहतूक व्यवस्था यासारख्या पर्यावरण नवोन्मेषाला  प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सिंह यांनी सांगितले.  यामुळे  पर्यावरणीय परिणाम साधण्यासोबतच  आर्थिक विकासाला चालना मिळून रोजगार निर्मितीसाठी नव्या संधी उपलब्ध होतात.

चक्रीवादळ, त्सुनामी, भूस्खलन, वणवेयांसारख्या विविध नैसर्गिक धोक्यांचा अंदाज वर्तवण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी जी -20 समुदायाकडे  प्रगत अंतराळ तंत्रज्ञान असल्याकडे डॉ. सिंह यांनी लक्ष वेधले.  या तंत्रज्ञानाची उत्पादने जी -20 च्या बाहेरील देशांसाठी सामायिक  करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, जेणेकरून ते अशा आपत्तींशी सामना करू शकतील.

क्वांटम तंत्रज्ञान विकसित करणे, क्वांटम कम्युनिकेशनसंदर्भात शोध, क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम अल्गोरिदम हे आमच्या पुढील  जी -20 संशोधन कार्यक्रमपत्रिकेवर आहेत, असे डॉ. सिंह यांनी प्रतिनिधींना सांगितले.  क्वांटम तंत्रज्ञानप्रणीत  आर्थिक विकासाला गती देण्यासाठी विज्ञानविषयक  आणि औद्योगिक संशोधन आणि विकास  वाढवण्याचे आमचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.

शास्त्रज्ञांनी अनुवांशिकता आणि जैवतंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे आणि  रोगांच्या अनुवांशिक आधाराचा अभ्यास करणे, वैयक्तिक औषध पद्धती विकसित करणे आणि अनुवांशिक अभियांत्रिकी तंत्र प्रगत  करणे यावर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे डॉ. सिंह यांनी नमूद केले.

जग वेगाने डिजिटल परिवर्तन अनुभवत  असताना, आपली  सायबर-सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. महत्त्वाची  डिजिटल मालमत्ता आणि डेटाचे संरक्षण करण्यासाठी प्रगत प्रणाली विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आजच्या कसोटीच्या  काळात  तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्टार्टअप्सच्या उदयाचे साक्षीदार जग असून या कंपन्यांनी आरोग्यसेवा, वित्त, कृषी आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांसाठी AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करण्यात उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.  कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि डेटा अॅनालिटिक्सच्या एकत्रीकरणामुळे निर्णय प्रक्रिया सुधारण्यात, उत्पादकता वाढविण्यात आणि विविध उद्योगांमध्ये नाविन्यपूर्णता वाढविण्यात मदत झाली आहे, असे ते म्हणाले.

डॉ. सिंह यांनी खनिज संसाधने, ऊर्जा आणि सागरी अन्न याबाबत  आपल्या महासागर आणि समुद्राच्या अफाट क्षमतेकडे जी 20 प्रतिनिधींचे लक्ष वेधले आणि मत्स्यपालन, सागरी संशोधन, किनारपट्टी पर्यटन, अक्षय ऊर्जा निर्मिती यामध्ये  शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.  आपल्या  महासागरांमध्ये वाढलेल्या प्लास्टिक आणि मायक्रोप्लास्टिक्सबद्दल देखील आपण  चिंतीत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक सागरी जीवांच्या शरीरात ते जात असल्याने आपल्या अन्नसाखळीतही त्यांचा प्रवेश होत असून यावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आम्ही पर्यावरणासाठी (LiFE) जीवनशैलीचा अवलंब करण्यामध्ये संशोधन आणि नवोन्मेष यांचे महत्त्व जाणतो.  यामुळे  शाश्वत विकास उद्दिष्टे  साध्य करण्याच्या दिशेने प्रगती होऊ शकते तसेच यासाठी  प्रोत्साहन देणाऱ्या  कृतींना पाठबळ देण्यास वचनबद्ध आहोत. .

जी 20 संशोधन मंत्र्यांच्या बैठकीतील आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ जितेंद्र सिंग यांनी संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह  (RIIG) परिषदेदरम्यान, झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले.  चर्चेदरम्यान  सदस्य राष्ट्रांनी ऊर्जा सामग्री व  उपकरणांशी संबंधित आव्हाने, सौर ऊर्जा वापर व  फोटोव्होल्टेइक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेसाठी साहित्य व  प्रक्रियांसह विविध विषयांवर आणि धोरणात्मक बाबींवर चर्चा केली.  नवीन संसाधन-कार्यक्षम, शाश्वत आणि अधिक चक्राकार  जैव-आधारित तंत्रज्ञान, उत्पादने व  सेवा तयार करण्यात संशोधन, विकास आणि नवकल्पना यासारखे  धोरणात्मक मुद्दे ; नील अर्थव्यवस्था  क्षेत्रे आणि संधी; निरीक्षण डेटा आणि माहिती सेवा; सागरी परिसंस्था आणि प्रदूषण; नील अर्थव्यवस्था  व्यवस्थापन आणि दृष्टीकोनसागरी जीवन संसाधने आणि जैवविविधता; खोल समुद्र महासागर तंत्रज्ञान; यांचा यात समावेश होता.

डॉ जितेंद्र सिंह यांनी  रचनात्मक आणि फलदायी चर्चेसाठी  जी 20 प्रतिनिधींचेआभार मानले. याचसोबत  भारताने गेल्या 5-6 महिन्यांत आयोजित केलेल्या संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह बैठका आणि परिषदांच्या मालिकेची  सांगता झाली.

सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आणि भारताच्या संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम समूह कार्यक्रमपत्रिकेत   प्राधान्य क्षेत्रावरील मौल्यवान अभिप्राय आणि टिप्पण्यांसह पाठिंबा दिल्याबद्दल डॉ. सिंह यांनी त्यांचे आभार मानले. संशोधन आणि नवोन्मेषच्या  मार्गाने संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे (UN SDG-2023) गाठण्यात योगदान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग आणि भागीदारीद्वारे भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.  

 

 

Jaydevi PS/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1937449)
Read this release in: English