युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

जागतिक प्रगतीची गुरुकिल्ली दक्षिण आशियाई युवकांच्या हाती : जी-20 साठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांचे आयएमसी वायएलएफ युवक परिषद 2023 मध्ये प्रतिपादन


देशातील तरुण वर्ग आणि चैतन्यमयी स्टार्ट अप परिसंस्थेसह भारत तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाची प्रमुख प्रेरक शक्ती म्हणून उदयाला आला आहे: जी-20 साठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत

Posted On: 28 JUN 2023 7:45PM by PIB Mumbai

मुंबई, 28 जून 2023

 

जी-20 साठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटले आहे की, दक्षिण आशियातील युवकांकडे  त्यांच्या आकांक्षा, लवचिकता तसेच धोका पत्करण्याची तयारी  या गुणांनी प्रेरित जन्मजात उद्योजकीय जिगीषा आहे. मुंबईमध्ये  आभासी पद्धतीने आयोजित आयएमसी वायएलएफ युवक परिषद 2023 मध्ये ते आज बोलत होते. जी-20 साठीचे भारताचे शेर्पा यांनी युवकांची नवोन्मेषशाली साधने निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कौशल्य विकास आणि शैक्षणिक संधी तसेच सरकारी आणि खासगी संस्थांमधील सहयोगी संबंध यांचे महत्त्व विषद केले.

भारताकडील जी-20 समूहाच्या अध्यक्षतेबाबत बोलताना अमिताभ कांत म्हणाले की,जगासाठी समावेशक तसेच शाश्वत भविष्य घडवणे हे या अध्यक्षतेचे उद्दिष्ट आहे आणि देशातील तरुण वर्ग आणि चैतन्यमयी स्टार्ट अप परिसंस्थेसह भारत तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाची प्रमुख प्रेरक शक्ती म्हणून उदयाला आला आहे. गेल्या काही वर्षांत देशातील स्टार्ट अप उद्योगांची संख्या 400 वरुन वाढत जाऊन 90,000 झाली आहे आणि हे स्टार्ट अप उद्योग कृषी, शिक्षण, पोषण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमधील व्यापक फलनिष्पत्ती  आणि कमी खर्च यासंदर्भात  अभिनव संशोधने करत आहेत असे ते पुढे म्हणाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची प्रगती आणि स्टार्ट अप संस्कृती यांच्यामुळे आपला देश जागतिक पातळीवरील उपाययोजनांना मदत करण्याच्या स्थितीला पोहोचला असून तरुण संशोधकांना त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी देश उत्प्रेरकाचे कार्य करत आहे असे त्यांनी पुढे सांगितले. तरुणांना डिजिटल साधनांचा तसेच समाज माध्यमांचा स्वीकार करण्यास मदत करणाऱ्या आणि त्यायोगे त्यांना डिजिटलयुगासाठी सुसज्जित करून तंत्रज्ञानाचा समाज कल्याणासाठी वापर करण्यास सक्षम करणाऱ्या, दक्षिण आशियातील तंत्रज्ञानविषयक परिवर्तनाचे महत्त्व कांत यांनी अधोरेखित केले.

अर्थविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी या परिषदेत उद्घाटनपर भाषण केले. या भाषणात त्यांनी हवामान बदल विषयक समस्यांबद्दल भाष्य केले तसेच लाखोनी हरित रोजगार निर्माण करणाऱ्या शून्य उत्सर्जन विकास नमुन्याचे अनुसरण करण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की यासाठी आपल्याला आपली संपूर्ण उर्जा प्रणाली बदलून टाकून नवीकरणीय आणि शून्य उत्सर्जन असलेली विद्युत निर्मिती, विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराकडे जलद स्थित्यंतर,हरित हायड्रोजन जैवइंधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवणे आणि अशाच इतर तंत्रज्ञानांचा स्वीकार करावा लागेल. तसेच आपल्याला कार्बन क्रेडिट्स साठी एक जागतिक आराखडा निर्माण करावा लागेल आणि योग्य कृतीसाठी सरकारांशी भागीदारी करावी लागेल असे त्यांनी सांगितले. उत्सर्जन, जीडीपी विकास, रोजगार निर्मिती,प्रदूषण आणि उर्जा सुरक्षा यांच्या बाबतीत पाहायला गेले तर शून्य उत्सर्जन हा संपूर्ण सकारात्मक उपक्रम आहे असा विश्वास मला वाटतो, असे बोलून त्यांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी परिषदेच्या इमॅजिन, हील,युनाईट,क्रिएट आणि हार्मनी या संकल्पनांशी सुसंगत अशी माहितीचे आदानप्रदान करणारी सत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांतून प्रेक्षकांना सर्जनशील अर्थव्यवस्था, हवामानाच्या घडामोडी, हरित विकास आणि शाश्वतता, बदल घडवणारी उद्योजकता आणि अशाच प्रकारच्या इतर घटकांवर आधारित सत्रांमधून महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठीचा मंच उपलब्ध झाला. या सत्रांनी सहयोगात्मक प्रयत्नांतून  प्रेक्षकांना कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि विविध विषयांची माहिती मिळवण्याची अद्वितीय संधी उपलब्ध करून दिली.

आयएमसीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात आयएमसी  वायएलएफ च्या वार्षिक युवक परिषद 2023 ला सहयोग, सर्जनशीलता आणि नवोन्मेष यांच्या उर्जेला मूर्त स्वरूप देणारा कार्यक्रम म्हटले आहे. ते म्हणाले की याचे कारण असे आहे की हवामान बदल असो, आर्थिक विकास असो किंवा सामाजिक न्याय असो, या सर्व बाबतीत उद्भवणाऱ्या सर्वात गंभीर समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आजच्या  युवकाकडे आहे.

या आभासी परिषदेची माहिती घेण्यासाठी कृपया पुढील यु-ट्यूब लिंकवर क्लिक करा:

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1936069) Visitor Counter : 63


Read this release in: English