माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'योगाभ्यास करा, निरोगी राहा' : जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर डॉ. चंद्रशेखर साखरे यांचे आवाहन
जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आणि केंद्रीय संचार ब्युरो तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रोटोकॉलचे आयोजन
Posted On:
21 JUN 2023 2:35PM by PIB Mumbai
कोल्हापूर, 21 जून 2023
दैनंदिन ताणतणाव दूर ठेवून निरोगी जीवनासाठी नियमित योगासने करा, असे आवाहन करुन ‘योगाभ्यास करा, निरोगी रहा.’ असा मूलमंत्र कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती व मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने योगपटूंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग प्रात्यक्षिके केली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी, तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे, सचिन चव्हाण, योगाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक रवी कुमठेकर, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, रोहिणी मोकाशी, मनीषा पाटील, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक पूजा सैनी आदी उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय योगपटू पूर्वा किनरे व प्राप्ती किनरे यांनी योगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग आवश्यक आहे. योग हा केवळ योग दिनापुरता मर्यादित न राहता नियमितपणे करा,असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना 'फिट इंडिया' प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य भित्तीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील बाल योग पटूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तर कॉमन योगा प्रोटोकॉल मधील विविध योगासने उपस्थितांनी केली. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अर्ध हालासन यासारखी योगासने तसेच प्राणायाम व ध्यान करण्यात आले. ताणतणावापासून कमी करणाऱ्या हास्ययोगाचे प्रकारही सादर करण्यात आले. योग प्रार्थनेने प्रात्यक्षिकांची सुरुवात करण्यात आली. संकल्प व शांतीपाठाने समारोप करण्यात आला. मलाबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीने योग पटूंना खाऊ वाटप करण्यात आले तर केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने यावेळी प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व या गोष्टी मांडणाऱ्या कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
* * *
PIB Mumbai | CBC Kolhapur | MC/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934015)
Visitor Counter : 53