आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने आणि  एनएफडीसी, कैवल्यधाम योग संस्था तसेच  केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त सहकार्याने सामायिक योगा प्रोटोकॉल सादरीकरण कार्यक्रम आयोजित


पत्र सूचना कार्यालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, दूरदर्शन, आकाशवाणी, केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि केंद्रीय प्रकाशन विभाग यांचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कार्यक्रमात सहभागी

Posted On: 20 JUN 2023 3:29PM by PIB Mumbai

 

मुंबई 20 जून 2023

9वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 साजरा करण्यासाठी पत्र सूचना कार्यालय,मुंबईच्या वतीने आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), कैवल्यधाम योग संस्था आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या संयुक्त सहकार्याने आज मुंबई येथे एनएफडीसीच्या जे.बी.भवनात सामायिक योगा प्रोटोकॉल सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पत्र सूचना कार्यालय, मुंबई, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, दूरदर्शन, आकाशवाणी, केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि केंद्रीय प्रकाशन विभाग या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारीवर्ग या कार्यक्रमात सहभागी सहभागी झाला. कैवल्यधाम योग संस्थेचे संयुक्त संचालक रवी दिक्षित यांच्या नेतृत्वाखालील योग तज्ञांनी या सत्राला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात मुंबई येथील पत्रसूचना कार्यालयाचे संयुक्त संचालक नाना मेश्राम यांनी सांगितले की भारताकडील जी-20 अध्यक्षतेच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा योग दिन सोहळा अधिक उल्लेखनीय ठरला आहे. योगसाधना ही भारतात निरोगी जीवनशैलीसाठी स्वीकारण्यात आलेली प्राचीन कला असल्यामुळे आपल्या देशासाठी योग साधना करणे ही अनोळखी गोष्ट नाही असे ते म्हणाले. प्राचीन काळात ज्या ऋषीमुनींनी योगसाधना केली आणि ही साधना लोकप्रिय केली त्यांनी त्याकाळी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आणि आता संपूर्ण जगाने या साधनेचा स्वीकार केला असून तिला मान्यता देखील दिली आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी दर वर्षी  21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती त्यांनी दिली. म्हणूनच, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून आणि योगाला दैनंदिन जीवनाचा भाग करून घेऊन प्रत्येकाने या सोहोळ्यात देखील योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.  या सामायिक योग प्रोटोकॉल सादरीकरणात करून दाखवण्यात येणारी सोपी योगासने शिकून घ्यावी आणि ती करावीत अशा शब्दात  मुंबई येथील पत्रसूचना कार्यालयाचे संयुक्त संचालक नाना मेश्राम यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहित केले.

एनएफडीसीचे महासंचालक डी.रामकृष्णन यांनी योगाच्या महत्त्वाबाबत त्यांची मते मांडली. आपण स्वतः नियमितपणे योगसाधनेचा सराव करतो असे सांगून ते म्हणाले की, ही साधना केवळ आपले शरीर,मन आणि आत्म्यासाठी चांगली आहे असे नव्हे तर त्यातून आपली श्वसनक्रिया देखील नियमित होते. आपल्या स्नायूंना आराम देऊन रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच योग आपल्याला शांतता देते आणि आत्म्याला दिव्य अनुभव प्राप्त करून देते. बैठे काम करणाऱ्या लोकांना देखील अनेक योग प्रकार करता येण्यासारखे आहेत. योगसाधना ही अत्यंत मौल्यवान  क्रिया आहे आणि म्हणून प्रत्येकाने योगाचा सराव करावा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी असा सल्ला रामकृष्णन यांनी दिला.

मुंबईच्या कैवल्यधाम योग संस्थेचे संयुक्त संचालक रवी दिक्षित आणि त्यांच्या शिष्य अन्विता दिक्षित आणि आश्लेषा महाडिक यांनी सहभागींना त्यांच्या दिनचर्येत समाविष्ट करता येतील अशी सोपी योगासने करून दाखवली. या सादरीकरणासोबतच रवी दिक्षित यांनी योगासनांचा सराव करण्याचे महत्त्व आणि प्रत्येक आसनाची आपल्या शरीराच्या विशिष्ट अवयवाच्या स्वास्थ्याप्रती समर्पकता समजावून दिली. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी या सादरीकरणात उत्साहाने भाग घेतला आणि विविध आसनांच्या कृतीतून ताजेतवाने होण्याचा अनुभव घेतला.

मुंबई येथील पत्रसूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक निकिता जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उत्साहाने सहभागी झालेल्या सहयोगी संस्था आणि कार्यक्रमातील सहभागी यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पत्रसूचना कार्यालयाच्या माहिती सहाय्यक सोनल तुपे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीरित्या सूत्रसंचालन केले.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1933681) अभ्यागत कक्ष : 127
Read this releasein: English