शिक्षण मंत्रालय

युवकांना सक्षम बनवण्यासाठी वास्को द गामा येथे जी-20 जनभागीदारी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 15 JUN 2023 7:03PM by PIB Mumbai

पणजी, 15 जून 2023

वास्को द गामा येथे आज जी-20 जनभागीदारी कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मध्ये आयोजित या कार्यशाळेला केंद्र सरकारच्या  शिक्षण मंत्रालयानं सहकार्य केले. मौल्यवान माहिती देऊन युवकांना सक्षम बनवणे आणि त्यांच्यात जागतिक नागरिकत्वाची भावना रुजवणे  हा या कार्यशाळेमागचा हेतू होता. तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला. या कार्यक्रमात दक्षिण गोव्यातील अनेक शाळा उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. सर्वांगीण विकास आणि जागरूकतेप्रति  शैक्षणिक संस्थांची वचनबद्धता त्यातून दिसून आली.

कार्यशाळेचे उद्‌घाटन गोवा सरकारच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीइआरटी) माजी संचालक नागराज जी होन्नेकेरी यांनी केले. वसुधैव  कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेवर त्यांनी आपल्या बीजभाषणात भर दिला. लहानपणापासूनच मुलांमध्ये ही कल्पना रुजवण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.  मानव, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अगदी निर्जीव पदार्थ देखील एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते एकाच जागतिक कुटुंबाचा भाग आहेत याची जाणीव मुलांना करून देण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.

या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020(एनईपी 2020) तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (एफएलएन) यांच्यासह विविध विषयांवर आधारित अर्थपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले. दाबोलीमच्या एनसीएसशाळेच्या प्राचार्य अनुपमा मेहरा यांनी एनईपी 2020 वर आधारित सत्राचे संचालन केले आणि या धोरणाची संकल्पना आणि उद्दिष्ट्ये यांच्या संदर्भात उपस्थितांना मौल्यवान माहिती दिली. अध्ययन केंद्रित आणि समग्र शिक्षण व्यवस्थेची जोपासना करणाऱ्या एनईपी 2020 च्या अंमलबजावणीसंदर्भात परस्पर संवादात्मक चर्चा आणि सादरीकरणे यांच्या माध्यमातून शिक्षणतज्ञ आणि प्रशासकांना माहिती देण्यात आली. त्याच बरोबर, या कार्यशाळेत जी-20 समूह आणि जागतिक पटलावरील त्याचे महत्त्व यांच्या संदर्भात जागरुकता वाढवण्याप्रती समर्पित सत्र देखील आयोजित करण्यात आले होते. सहभागात्मक उपक्रम आणि चर्चांच्या माध्यमातून या सत्रातील सहभागींना जागतिक आव्हानांचा सामना करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना आणि शाश्वत भविष्याची उभारणी या बाबतीत जी-20 समूहाच्या भूमिकेबाबत अधिक सखोल माहिती देण्यात आली. जागतिक घडामोडींमध्ये सक्रीय सहकार्य आणि सहभागाचे महत्त्व तसेच जगाचे जबाबदार नागरिक होण्यासाठी युवा मनांना सक्षम करणे यांचे महत्त्व सांगण्यावर या सत्रामध्ये अधिक भर देण्यात आला.

भारताकडे असलेली जी-20 समूहाची अध्यक्षता, एनईपी 2020 तसेच मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयी जाणीव निर्माण करण्यासाठी वास्को द गामा येथील केंद्रीय विद्यालयाने देखील 1 जून ते 15 जून 2023 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये चित्रकला, निबंध लेखन,प्रश्नमंजुषा तसेच प्रभात फेऱ्या अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.

S.Kane/Prajna/Sanjana/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1932696) Visitor Counter : 136


Read this release in: English