माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी माध्यमाची नैतिकता पाळून योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात एक 'चेक ॲण्ड बॅल्नेस ' व्यवस्था निर्माण करावी - वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगरागन यांचे आवाहन


पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने वाशिम येथे आयोजित केलेली ‘वार्तालाप’ ही एक दिवसीय माध्यम परिषद संपन्न

Posted On: 15 JUN 2023 4:47PM by PIB Mumbai

वाशिम / मुंबई, 15 जून 2023

सद्यःस्थितीत माध्यमांचे स्थित्यंतर मुद्रीत माध्यमांकडून समाज माध्यमाकडे होत असून केंद्र तसेच राज्य सरकार यांच्यातर्फे   योजनांची यशस्वी  अंमलबजावणी बाबत प्रसारमाध्यमे यशकथा तसेच त्रुटी देखील निदर्शनास आणतात . लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या या प्रसारमाध्यमांनी माध्यमाची नैतिकता पाळून अशा योजनांच्या संदर्भात एक एक 'चेक ॲण्ड बॅल्नेस ' व्यवस्था निर्माण करावी असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगरागन एस . यांनी वाशिम येथे  केले .

वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, यांनी  आज, 15 जून  रोजी  वाशिम येथे  केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या विषयावरील ‘वार्तालाप’ या एक दिवसीय माध्यम परिषदेचे उद्‌घाटन केले , त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी, वाशिम जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तसेच नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयातील माध्यम आणि संवाद अधिकारी धनंजय वानखेडे उद्‌घाटनपर कार्यक्रमाला उपस्थित होते.

उद्‌घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी शण्मुगराजन  म्हणाले की ,सरकारच्या श्वेत क्रांती, हरित क्रांती अशा विविध उपक्रमांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात माध्यमांनी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. सरकारच्या योजना किती प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत, तसेच त्यांचा किती प्रमाणात लाभ होतो आहे आणि या योजनांच्या उपयुक्ततेबाबत खराखुरा अभिप्राय आम्हाला पत्रकारांकडून मिळत असतो, आणि त्यातून आम्हांला आमच्या कामाची दिशा निश्चित करता येते  असे त्यांनी सांगितले. तसेच सरकारच्या योजनांमध्ये होणारी दिरंगाई, कमतरता यांची दुरुस्ती करण्याची संधी आम्हाला हा लोकशाहीचा चौथा स्तंभ देत असतो असेही ते म्हणाले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत म्हणाल्या की , सरकारच्या योजनांची अंमलबजावणी आणि त्या योजनांना मिळत असलेले यश जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविणे आवश्यक आहे. अनेकदा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राहिलेल्या त्रुटी अधोरेखित न करता माध्यमांनी ग्रामीण तसेच शहरी भागात राबवल्या जात असलेल्या चांगल्या योजना आणि या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात घडून आलेले बदल यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी. वाशिम येथे पत्रसूचना कार्यालयाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला ‘वार्तालाप’ हा कार्यक्रम त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे असे त्या म्हणाल्या. या एकदिवसीय कार्यक्रमात आकांक्षित जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच माध्यम क्षेत्रातील पत्रकार बंधू-भगिनींसाठी सरकारने राबविलेल्या योजना यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करताना, या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल  उपस्थित मान्यवर तसेच माध्यम प्रतिनिधींचे आभार मानून मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी म्हणाल्या की, सरकारच्या विविध योजना तसेच उपक्रम आणि घडामोडींची माहिती इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमधून विविध वृत्तपत्रे आणि माध्यम संस्थांपर्यंत पोहचवण्याचं काम पत्रसूचना कार्यालय करते. याशिवाय दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधणे आणि शासनाची धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय, वेळोवेळी विविध विषयांवरच्या चर्चासत्रांचंही आयोजन करते. पत्रसूचना कार्यालय राज्यातील तीन कार्यालयांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांसह सर्व पत्रकारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि आजचा ‘वार्तालाप’हा कार्यक्रम म्हणजे अशाच प्रकारचा उपक्रम आहे असे जयदेवी पुजारी-स्वामी म्हणाल्या. एका अर्थानं अशी परिषद म्हणजे, सरकार आणि ग्रामीण भागातील माध्यमांमधे एक दुवा निर्माण करणारं माध्यम आहे, कारण शहरी भागातील पत्रकारांना अशी माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना अशा कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे  सकारात्मक आणि विश्वसनीय माहिती पुरविण्याचे काम पत्रसूचना कार्यालय करत असते असे त्यांनी सांगितले.

या उद्घाटनपर सत्रानंतर अनेक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते . या सत्राची सुरुवात वाशिम जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आपल्या मागदर्शनपर व्याख्यानाने केली. ते म्हणाले की,वाशिम जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ व्हावी यासाठी जलसंधारण योजना, भूजल पुनर्भरण योजना, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार असे विविध कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. आकांक्षित जिल्हा उपक्रम तसेच जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, क्षयरोगमुक्त जिल्हा, मुद्रा योजना,जननी सुरक्षा योजना, शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानांची माहिती देणे अशा योजना केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत आहेत अशी माहिती वाशिम जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी दिली.

वाशिमचे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास ) आर. जी.  सोनखासकर यांनी या कार्यक्रमात ‘आकांक्षित  जिल्हा विकास कार्यक्रमात माध्यमांची भूमिका’ या विषयावर सादरीकरण केले. देशभरातील 28 राज्यांतील 115 जिल्हे आकांक्षित म्हणून जाहीर झाले असून त्यात राज्यातील वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. नीती आयोगाद्वारे साखरा येथे उभारण्यात आलेले मॉडेल स्कूल, जिल्ह्यातील 6 अंगणवाड्यांना मिळालेले आयएसओ मानांकन ही नीती आयोगाच्या कामाची फलश्रुती आहे. याचेदेखील वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आयोगातर्फे जिल्ह्यातील  क्षयरोग रुग्णांसाठी रुग्णवाहिका, गर्भवती महिलांसाठी फीटल डॉपलर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत तसेच शेतकऱ्यांना सीड ड्रेसिंग ड्रम, शेतीची अवजारे इत्यादी उपलब्ध करून दिली जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

यानंतर वाशिम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती अनिसा  महाबळे यांनी  ‘आकांक्षित  जिल्हे उपक्रमांतर्गत कृषी आणि कृषी संलग्न क्रिया-प्रक्रियांशी संबंधित क्षमता’  या विषयावर सादरीकरण केले. नीती आयोगातर्फे शेतकऱ्यांना सीड ड्रेसिंग ड्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांचा वापर करून सोयाबीनचे बिजोत्पादन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाशिम जिल्ह्यात आता तूर उत्पादन होत असून तूरडाळ प्रक्रियेला चालना मिळाली आहे  तसेच गहू, हरभरा यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून क्लिनिंग, ग्रेडिंग अशा प्रक्रिया सुरु झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात करडई तेल उत्पादन वाढले असून तेलघाणीसुरु झाल्या आहेत, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनांसारख्या अनेक योजना ऑनलाईन उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली.शेतकऱ्यांना केवळ 4 कागदपत्रांच्या आधारे या योजनांचा लाभ घेता येतो, त्यांना कृषी विकास केंद्रांतून प्रशिक्षण दिले जाते तसेच बीजभांडवल देखील पुरवण्यात येते असे त्या म्हणाल्या.

व्याख्यान सत्रानंतर तिसऱ्या सत्रात 'विकास संवादात ग्रामीण माध्यमांकडून नागरिकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी पीआयबीची  भूमिका 'यावर सादरीकरण उपसंचालिका जयदेवी स्वामी पुजारी यांनी केले. यानंतर पीएम -स्वनिधी , प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या  लाभार्थ्यांनी उपस्थितांशी संवाद साधला .

तृप्ती पापड उद्योगाच्या संचालिका वाशिमच्या लाखाळा येथील विमल राजगुरू यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा त्यांना कसा लाभ झाला याचे कथन त्यांनी यावेळी केले . त्यांनी या पापड उद्योगांतून 30 महिलांना आतापर्यंत रोजगार दिला असून यापुढे 100 महिलांना रोजगार देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

वाशिमच्या हकिम अली नगरातील पक्क्या घराचे लाभार्थी शेख हरुण यांनी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत त्यांना अर्थसहाय्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले .

यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया या कार्यशाळेच्या आयोजनाबदल व्यक्त केल्या आणि प्रतिसाद संकलनाने कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रा . गजाजन वाघ यांनी केले . या कार्यशाळेला वाशिम जिल्हा आणि  तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Jaydevi PS/S.Chitnis/D.Wankhede/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1932612) Visitor Counter : 214


Read this release in: English