भूविज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागरी संशोधन केंद्रातर्फे जागतिक महासागर दिन साजरा
Posted On:
08 JUN 2023 9:07PM by PIB Mumbai
पणजी, 8 जून 2023
केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागरी संशोधन केंद्रातर्फे जागतिक महासागर दिनानिमित्त (एनसीपीओआर) आज दक्षिण गोव्यातील बायना समुद्रकिनाऱ्यावर किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. सागरी संवर्धनाच्या तातडीच्या गरजेबाबत जनतेमध्ये जागरुकता वाढवण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

एनसीपीओआर संस्थेतील सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.अनिल कुमार यांनी या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांचे विचार व्यक्त केले. जागतिक हवामानाचा समतोल राखण्यात महासागराच्या महत्त्वाच्या भूमिकेवर अधिक भर देत डॉ.कुमार यांनी महासागरांची उष्णता शोषून घेण्याची अमर्याद क्षमता संरक्षित करण्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, वातावरणापेक्षा 50 पट अधिक उष्णता शोषून घेण्याची क्षमता असलेले हे महासागर हवामानाच्या पद्धती नियमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, सध्या महासागरांची ही क्षमता देखील ओलांडण्यात आली असून आता अधिकची उष्णता महासागरांकडून वातावरणाकडे परत फेकली जात आहे आणि परिणामी मानवी जीवनावर त्याचा दुष्परिणाम होत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, डॉ.कुमार यांनी यावेळी, कार्बन मोनॉक्साईड या प्रमुख विषारी वायुसह इतर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की हे वायू प्रामुख्याने मोटार वाहनांचा वापर तसेच ज्वलन प्रकिया यातून बाहेर पडतात, यातून निर्माण होणारा हरितगृह वायूंचा थर लॉंगवेव्ह उत्सर्जनाला अवकाशात फेकण्यापासून थोपवतो, यामुळे हरितगृह परिणाम दिसून येतात. या सगळ्यातून, अधिकची उष्णता आणि कार्बन मोनॉक्साईड महासागरांमध्ये शोषले जातात, त्यातही ध्रुवीय प्रदेशांतील कमी तापमानामुळे ही प्रक्रिया त्या भागात अधिक प्रमाणात घडते. एकदा या शोषण्याची संपृक्तता पातळी गाठली की त्यानंतर महासागरी अभिसरण प्रक्रियेद्वारे जास्त प्रमाणात शोषलेली उष्णता आणि कार्बन मोनॉक्साईड पुन्हा वातावरणात फेकले जातात. यामुळे हवामानातील तापमान वाढ आणि जगातील हवामान बदल घडून येतात.

एनसीपीओआर ही संस्था यासंदर्भात अंटार्क्टिक आणि आर्क्टिक प्रदेशाच्या अभ्यासावर त्यांचे संशोधनात्मक प्रयत्न केंद्रित करत आहे कारण या भागातील हिमनद्या आणि बर्फाच्छादित भाग वेगाने वितळत असून त्यामुळे हे पाणी लक्षणीय प्रमाणात महासागरांमध्ये विसर्जित होत आहे. याचसोबत, उष्णकटिबंधातील प्रदेशांमध्ये औष्णिक प्रसरण होऊ लागल्याने समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली असून जगातील महासागरी व्यवस्थेसाठी ही मोठ्या चिंतेची बाब आहे. प्रदूषण रोखणे आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे यावर डॉ.कुमार यांनी त्यांच्या भाषणात भर दिला. आपल्यापैकी प्रत्येकाने वाहनांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे तसेच सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक वापर करणे यांसारख्या शाश्वत पद्धतींचा स्वीकार करुन परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. वास्को परिसरातील महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी देखील या सागर किनारी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.


S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1930891)