विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक महासागर दिना निमित्त राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आयोजित केली समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

Posted On: 08 JUN 2023 9:03PM by PIB Mumbai

 

पणजी, 8 जून 2023

जागतिक महासागर दिना निमित्त, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) आज गोव्यामधील कारंझालेम बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचे यशस्वीपणे आयोजन केले. आपले महासागर आणि किनारपट्टी भागाचे संरक्षण आणि जतन करण्याचे महत्व अधोरेखित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते.

ओशन सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव डॉ. मणी मुरली यांनी उपस्थितांना संबोधित करताना,  सर्व मान्यवर समुद्रशास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. सहभागींमध्ये नवीन आणि तरुण चेहऱ्यांच्या लक्षणीय उपस्थितीची त्यांनी दखल घेतली, ज्यामधून महासागर संवर्धनाच्या उदात्त कामाप्रति त्यांची आवड आणि समर्पण दिसून आले.

8 जून हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने 5 डिसेंबर 2008 रोजी मान्यता दिली असून, कोस्टल स्टडीज इन्स्टिट्यूट (CSI), अर्थात समुद्र किनारा अभ्यास संस्था आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) या दोन्ही संस्था हा दिवस दर वर्षी साजरा करतात. या परंपरेला अनुसरून, हा दिवस साजरा करण्यासाठी, एनआयओ मंचाचे संशोधक आणि विद्यार्थी संघटनेने संस्थेच्या परिसरात अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

जागतिक महासागर दिनाच्या अनुषंगाने, एनआयओ ने, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च (NCCR) आणि ओशन सोसायटी ऑफ इंडिया (OSI) च्या सहयोगाने,  गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर व्यापक समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रम आयोजित केला होता. देशातील विविध राज्यांमधील 17 समुद्रकिनारे या उपक्रमासाठी निवडण्यात आले असून, त्या ठिकाणी अशा स्वरुपाची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ही एकी प्रेरणादायी असून, गोवा इथे आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेने सहभागींमध्ये सौहार्दाची भावना निर्माण केली.

समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमादरम्यान, दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहभागींनी प्लॅस्टिक, जैव-कचरा आणि काच यांसारख्या टाकाऊ पदार्थांचे विलगीकरण केले. सहभागींनी आपल्या नागरी जबाबदारीचे पालन करून, परिश्रमपूर्वक कचऱ्याचे वर्गीकरण आणि संकलन केले. पुढील विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुनर्वापरासाठी पणजी शहर महामंडळाकडे (CCP) तो कचरा सुपूर्द केला जाईल.

 

  

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1930890) Visitor Counter : 104


Read this release in: English