पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोव्यात खारफुटी लागवड मोहिमेचे आयोजन
Posted On:
05 JUN 2023 6:56PM by PIB Mumbai
पणजी, 5 जून 2023
केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज गोव्यात चोराव येथील डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्यात खारफुटीच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधिपत्याखाली देशभर सुरु करण्यात आलेल्या मिष्टी अर्थात किनारपट्टी अधिवास आणि ठोस उत्पन्नासाठीच्या कांदळवन उपक्रमाचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 5 जून या आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोवा राज्य सरकारचा वनविभाग आणि उत्तर गोव्यातील वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन संस्था कांपाल रेंज यांनी संयुक्तपणे या कार्याक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की,आपल्यापैकी प्रत्येकाने वृक्षारोपण आणि प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी केली पाहिजे. “गोवा राज्य सरकार आणि त्यांचा वनविभाग या आघाडीवर चांगले काम करत आहे. अशा मोहिमांसाठी लोकसहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. पर्यावरण रक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशावर आपण आपले कार्य पुढे सुरु ठेवले पाहिजे.”
खारफुटी लागवडीविषयी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, मिष्टी उपक्रमाचा भाग म्हणून देशभरातील 9 राज्यांमध्ये 75 ठिकाणी हा खारफुटी लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “तापमानातील वाढीमुळे आपण किती अस्वस्थ होत आहोत याचा अनुभव आपण घेतला आहे. म्हणूनच, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, आपण अशा प्रकारचे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात आयोजित केले पाहिजेत,” ते म्हणाले.

मये येथील आमदार आणि गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट म्हणाले की स्वच्छ वातावरण राखण्यासाठी आपल्याला एकल वापराच्या प्लास्टिकविरुध्द उभे ठाकले पाहिजे. “पर्यावरणाचे हरप्रकारे संरक्षण करण्याच्या धेय्यासह आज खारफुटी लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भावी पिढ्यांच्या हितासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पर्यावरण रक्षणाचा संदेश अनुसरला पाहिजे.”
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करत गोवा वनविभागाचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक राजीव कुमार गुप्ता म्हणाले की मिष्टी कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्यात कांदळवन लागवड मोहिमा राबविल्या जाणार आहेत.
गोवा वनविभागाचे अतिरिक्त प्रमुख मुख्य वनसंरक्षक उमाकांत, वन(विकास) विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार राघव, मुख्य वनसंरक्षक सौरभ कुमार तसेच गोवा वनविभागातील इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केंद्र सरकारने मिष्टी योजनेची सुरुवात करण्याची घोषणा केली होती. या योजनेनुसार आर्थिक वर्ष 2023-24 पासून पुढील पाच वर्षांच्या काळात देशातील 11 राज्ये तसेच 2 केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 540 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी कांदळवनांच्या विकासासाठी योग्य क्षेत्राचा व्यापक प्रमाणात शोध घेण्यात येणार आहे.सरकारी-खासगी भागीदारीच्या माध्यमातून उत्कृष्ट लागवड तंत्रांचे सामायीकीकरण, संवर्धन उपक्रम, व्यवस्थापन पद्धती आणि संसाधनांना चालना देणे ही मिष्टी योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1930029)
Visitor Counter : 236