दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोवा टपाल विभागाकडून हरित पर्यावरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन
Posted On:
05 JUN 2023 3:16PM by PIB Mumbai
पणजी, 5 जून 2023
मिशन लाईफ (LiFE) पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी कृती करण्याच्या भारत सरकारच्या आवाहनाला अनुसरत जागतिक पर्यावरण दिन 2023 च्या औचित्याने गोवा डाक विभागाने अधिक निकोप आणि शाश्वत पर्यावरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचे आयोजन केले.

15 मे 2023 ते 5 जुन 2023 या कालावधीत राबवल्या गेलेल्या या उपक्रमांमध्ये गोव्याच्या टपाल विभागाचे कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभागी झाले. या उपक्रमांचा विशेष भर जैवसंस्थेचे रक्षण करण्यासंदर्भात जागरूकता वाढवणे आणि जाणीव जागृती निर्माण करणे यावर होता.
18 मे 2023 रोजी "पर्यावरण रक्षणासाठी मी काय करू शकतो" या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या वैयक्तिक भूमिकेविषयी प्रबोधन करण्यात आले. याशिवाय हरित आच्छादन वाढवणे आणि निरोगी जैवसंस्थेत योगदान देण्याच्या उद्देशाने 22 मे 2023 रोजी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

समाज माध्यमांच्या व्याप्तीचा लाभ घेऊन, प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी 23 मे 2023 रोजी "मिशन लाइफ फॉर एन्व्हायर्नमेंट" / "पर्यावरणपूरक जीवनशैली साठी मिशन लाईफ"नावाची समर्पित जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली. 25 मे 2023 रोजी, वास्को द गामा MDG कर्मचाऱ्यांनी दैनंदिन जीवनातील शाश्वत पद्धतींबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने चालण्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी चालण्याचा उपक्रम राबवला.
याशिवाय स्वच्छता राखण्याचे महत्व आणि एकदाच वापरायच्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी 26 ते 29 मे 2023 दरम्यान संपूर्ण प्रदेशातील टपाल कार्यालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 1 जून 2023 रोजी टपाल भवन इमारतीत रेखाटलेल्या वॉल आर्ट पेंटिंग अर्थात भित्तिचित्रांनी जनतेच्या मनात ठसा उमटवत निरोगी आणि शाश्वत वातावरण निर्माण करण्याबद्दल जनजागृतीमध्ये योगदान दिले.
या सर्व उपक्रमांमुळे टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची जाणीव जागृती झालीच शिवाय हरित भविष्य घडवण्यात सक्रियपणे योगदान देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समुदायाला प्रेरणा मिळाली.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1929921)
Visitor Counter : 170