माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठीच्या मिशन लाइफ जागृती अभियानाचे गोव्यामध्ये आयोजन
Posted On:
25 MAY 2023 6:30PM by PIB Mumbai
गोवा, 25 मे 2023
केंद्रीय संचार ब्युरो, गोवा आणि 1 गोवा बटालियन एनसीसी पणजी यांच्या वतीने आज मीरामार समुद्रकिनारी पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठीच्या मिशन लाईफ अभियान या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एनसीसी मधील 100 हून अधिक उत्साही छात्रसैनिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करतानाच इतरांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बदल घडवून आणण्याची प्रतिज्ञा केली.
फीडबॅक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बालाजी केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत जीवनशैली विषयी जागरूकता सत्र झाले. त्यांनी यावेळी अभियानाची उद्दिष्टे विशद केली आणि उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याच्या महत्त्वावर भर दिला.या सत्रानंतर शाश्वत जीवनशैली अंगिकारण्याचा संदेश देणाऱ्या पथनाट्याचे छात्रसैनिकांनी सादरीकरण केले. छात्रसैनिक आणि समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांमधील संवाद हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.
एनसीसी छात्रसैनिकांनी पर्यटकांना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासंदर्भात आणि शाश्वत जीवन पद्धतींचा अवलंब करणे याविषयी जागरूक केले. हा संवाद या अभियानाचा संदेश देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या गरजेबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रभावी ठरला.
1 गोवा बटालियन एनसीसी पणजीचे कमांडिंग ऑफिसर, कर्नल एमकेएस राठोड, पीआयबी गोवाचे उपसंचालक गौतम कुमार आणि केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी अधिकारी, रियास बाबू या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मिशन लाइफ( LiFE) अभियानाबद्दल
1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो येथे आयोजित कॉप 26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी लाईफ (LiFE) ही संकल्पना मांडली.मिशन-मोड, वैज्ञानिक आणि व्यापक कार्यक्रमाद्वारे लाईफच्या कल्पना आणि ध्येय अंमलात आणणे आणि हवामान बदलासंदर्भात चर्चेसाठी भारताची वचनबद्धता प्रदर्शित करणे हे मिशन लाईफचे उद्दिष्ट आहे. मिशन लाईफची (LiFE) रचना ही 2022 ते 2027 या कालावधीत पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृती करण्याच्या अनुषंगाने किमान एक अब्ज भारतीय आणि जगातील इतर नागरिकांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. भारतात, 2028 पर्यंत ग्राम आणि शहरी स्थानिक संस्थांपैकी 80%संस्था पर्यावरणस्नेही बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927293)
Visitor Counter : 104