वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मुंबईत सिप्झ- विशेष आर्थिक क्षेत्राच्या वतीने दहा दिवसांच्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
5,000 हून अधिक बाटल्या रक्त संकलन अपेक्षित
Posted On:
22 MAY 2023 5:27PM by PIB Mumbai
मुंबई, 22 मे 2023
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील, मुंबईतील सिप्झ अर्थात सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया क्षेत्र- विशेष आर्थिक क्षेत्र आपल्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून दहा दिवस महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सिप्झ- विशेष आर्थिक क्षेत्राचे क्षेत्रीय विकास आयुक्त सनदी अधिकारी श्याम जगन्नाथन याच्या हस्ते आज या महा रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

एखाद्याला जीवदान देण्यासाठी रक्ताची गरज पडते याच उदात्त हेतूने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरासारख्या उपक्रमासाठी जगन्नाथन यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सिप्झची प्रशंसा केली. या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करून या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांना रेल्वे स्थानकांवरून येण्याची आणि परत सोडण्याची सुविधाही सिप्झ प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी कांजूरमार्ग रेल्वे स्थानक आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांसाठी अंधेरी रेल्वे स्थानकावरून यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे रक्तदान शिबीर दहा दिवस सुरळीत पार पडावे तसेच नोंदणी केलेल्या रक्तदात्यांच्या सोयीसाठी, सिप्झ- विशेष आर्थिक क्षेत्राने आपल्या परिसरात, बीएफसी इमारत, एसडीएफ 8 आणि आयसीएच कॅन्टीन या तीन प्रमुख ठिकाणी आवश्यक व्यवस्था केली आहे या ठिकाणी अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध आहेत.

सिप्झच्या वतीने गेल्या वर्षीही आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी रक्तदान शिबीराच्या माध्यमातून रक्तदात्यांकडून 3,500 हून अधिक बाटल्या रक्त संकलित करण्यात आले होते. यंदा यापेक्षा अधिक म्हणजे 5,000 हून अधिक बाटल्या रक्त संकलन अपेक्षित आहे. सिप्झ मधील 150 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या 5,000 पेक्षा अधिक रक्तदात्यांचा सहभागाची अपेक्षा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. हे रक्तदान शिबीर महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे, सुरक्षितता आणि व्यावसायिकतेची सर्वोच्च मानके सुनिश्चित करून संकलित केलेले रक्त मुंबईतील 7 सरकारी रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

* * *
PIB Mumbai | S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1926365)
Visitor Counter : 160