उपराष्ट्रपती कार्यालय

विद्यार्थ्यांनी नवा भारत@2047 चा आपला आराखडा लिहायला हवा असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आवाहन


चंडीगड इथल्या पंजाब विद्यापीठाच्या सत्तराव्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

विद्यापीठाची सिनेट, सिंडीकेट, विद्यार्थी संघटना, शिक्षक आणि बिगर-शिक्षक संघटनांनी उपराष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 20 MAY 2023 3:39PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे, की त्यांनी अथक परिश्रम घ्यावेत, संधींचा लाभ घ्यावा आणि 2047 मध्ये, जेव्हा देश स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे करेल, तेव्हाचा नवा भारत कसा असेल, याचा स्वतःचा आराखडा  तयार करावा. ते आज चंडीगड इथे पंजाब विद्यापीठाच्या सत्तराव्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.  विद्यार्थ्यांना आव्हानांमधून संधी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देताना ते म्हणाले की, एखादी असामान्य कल्पना आपल्या मनातच ठेवण्याइतकी दुसरी कोणतीही घातक गोष्ट नाही. आपल्यामधील प्रतिभेचा शोध घेऊन, आणि क्षमतांचा वापर करून आपल्या मनातील कल्पनांना कृतीत उतरवा.

समारंभादरम्यान, उपराष्ट्रपती, जे पंजाब विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत, त्यांनी प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि समाज सेवक, डॉ सुधा एन. मूर्ती यांना ऑनरिस कॉसा (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी, आणि भारताचे माजी सरन्यायाधीश आणि खासदार (राज्यसभा) रंजन गोगोई यांना ऑनरिस कॉसा (कायद्यांचे डॉक्टर) पदवी प्रदान केली.

समारंभाला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना, समाजाच्या व्यापक भल्यासाठी योगदान देण्याची आणि सर्वांच्या हितासाठी काम करण्याच्या त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. देशाला सदैव सर्वोच्च प्राधान्य मिळेल, हे सुनिश्चित करा, आणि याबाबत मनात  सखोल भावना निर्माण करा, ते म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे गेम चेंजर असल्याचे नमूद करून उपराष्ट्रपती म्हणाले की, सर्व विभागांशी सल्लामसलत करून विकसित केलेले हे धोरण सर्व स्तरांवरील शिक्षणामध्ये परिवर्तन घडवत आहे.

भारतामधील डिजिटल परिवर्तनाचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की, भारताचा  डिजिटल विकास म्हणजे जागतिक दर्जाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असून, तो डिजिटल परिवर्तनामधून जात असलेल्या इतर देशांसाठीचे एक मॉडेल असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मान्य केले आहे.  पीएम किसान सम्मान निधी, मुद्रा योजना यासारख्या थेट लाभ हस्तांतरण योजनांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या योजना भारताच्या बदलत्या प्रशासन मॉडेलचे प्रतिबिंब असून, यामध्ये  गळतीला कुठलाही वाव मिळत नाही.   

पंजाब विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू- प्रा. रेणू विज यांच्या कार्यकाळात हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे, हे आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींनी आवर्जून नमूद केले. पंजाब विद्यापीठातून अनेक नामवंत लोक घडले आहेत, या गोष्टीची प्रशंसा करत, त्यांनी विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

***

R.Aghor/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925892) Visitor Counter : 114