नौवहन मंत्रालय
सागरी क्षेत्रात गेल्या काही वर्षात केलेल्या धोरणात्मक सुधारणा आणि आर्थिक पाठबळ यामुळे, ह्या क्षेत्रात महिला खलाशांची संख्या 3327 पर्यंत पोहोचली- केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल
सागरी व्यावसायिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता आणणे ह्या क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असून केंद्र सरकार त्यासाठी वचनबद्ध – राज्यमंत्री श्रीपाद नाईक
केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत ‘सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसासाठीच्या दिनानिमित्त’ मुंबईत विशेष कार्यक्रम संपन्न
सागरी क्षेत्रातल्या विविध विभागात महिला म्हणून प्रथम पाऊल टाकत, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोळा कर्तृत्ववान महिलांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सत्कार
Posted On:
18 MAY 2023 4:33PM by PIB Mumbai
मुंबई, 18 मे 2023
आज ‘सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसासाठीचा दिन’ असून या निमित्त मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेने, 18 मे हा सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला होता. याचे औचित्य साधून जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग संचालनालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, नौवहन महासंचालनालयाचे महासंचालक आणि एनएमडीसी (मध्य) चे अध्यक्ष राजीव जलोटा देखील यावेळी उपस्थित होते. पवईच्या सागरी प्रशिक्षण संस्थेत या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या दिवसाची यंदाची संकल्पना, “स्त्री पुरुष समानतेसाठी व्यक्ती आणि समूहांचे जाळे निर्माण करणे,” अशी आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, या कार्यक्रमासाठी दिलेला विशेष संदेश, दूर दृश्यप्रणाली मार्फत दाखवण्यात आला. या दिनानिमित्त सागरी क्षेत्रात कार्यरत सर्व महिलांना शुभेच्छा देत, त्यांनी महिलांचे या क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. हा दिवस, सागरी व्यवसाय क्षेत्रात महिलांची भरती, त्यांनी या क्षेत्रात टिकून राहावे आणि त्यांना इथे शाश्वत रोजगार मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याची संधी आपल्याला देतो, असे सोनोवाल म्हणाले. आज जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘नारी शक्ती’ला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवत आहोत, अशावेळी, ही संकल्पना अधिकच संयुक्तिक ठरते, असे सोनोवाल म्हणाले.

यंदाची संकल्पना, सागरी क्षेत्रातील स्त्री-पुरुष असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, तसेच यातून सांघिक भावना आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे महत्त्व अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सागरी क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रात महिलांची संख्या वाढवणे आणि त्यांची प्रगती साधण्याला, केंद्र सरकारने कायमच प्राधान्य दिले आहे. सर्व महिलांना समान हक्क मिळावे आणि त्या सक्षम व्हाव्यात, या शाश्वत विकास उद्दिष्टाची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सोनोवाल यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात अधिकाधिक संख्येने महिला खलाशी याव्यात, यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व आर्थिक सहाय्य आणि धोरणात्मक पाठबळ देत आहोत. सरकारने या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच, आज भारतीय महिला खलाशांची संख्या, 3327 इतकी झाली आहे, असेही सोनोवाल यांनी सांगितले. महिला खलाशांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, सरकारने महिला खलाशांसाठी विशेष तक्रार निवारण व्यवस्था उभी केली आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.
केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीही आपल्या भाषणात, आज सत्कार करण्यात आलेल्या सागरी क्षेत्रातल्या सर्व महिला व्यावासायिकांचे अभिनंदन केले. सागरी क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी विविध व्यक्ती आणि संस्थांना एकत्रित आणण्याचे, त्यांच्यातला समन्वय वाढवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महिलांना विविध क्षेत्रात संधी दिल्यामुळे संपूर्ण समुदायाचेच उत्थान होते, देशांचीही प्रगती होते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे, असे नाईक म्हणाले. तसेच, महिलांनी केलेले शांतता करारही दीर्घकाळ प्रभावी ठरले आहेत. सामाजिक विषयांवरही महिलांच्या जाणीवा अधिक प्रगल्भ असतात, हे सगळे पुरावे, महिलांना समान संधी म्हणजे, सर्वांची प्रगती हेच तत्व दर्शवणारे आहेत, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या अखत्यारीत आठ महिला सागरी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यात 152 देशांसह एकूण 490 सभासद आहेत, अशी महिती त्यांनी दिली. या संस्था, विविध मंचांवर त्यांच्या क्षेत्रांशी संबंधित समस्या, मुद्दे मांडू शकतात, यातूनही महिला खलाशांची संख्या वाढू शकते, असे ते म्हणाले. भारतीय सागरी खलाशी महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मर्चंट नेव्हीच्या भारतीय अधिकारी कॅप्टन राधिका मेनन, ज्यांना, सात मच्छीमारांची यशस्वी सुटका करणाऱ्या धाडसी ऑपरेशन बद्दल, 2016 साली, आंतरराष्ट्रीय सागरी संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते-, त्यांचे कार्य या क्षेत्रातल्या सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, असेही नाईक यांनी सांगितले. भारतीय सागरी क्षेत्र: भविष्यातील आराखडा 2030 मध्ये, महिला खलाशांना विविध जबाबदाऱ्या देण्याचा आणि इतर प्रोत्साहनपर उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्त सागरी व्यवसायाच्या विविध विभागात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा त्यांनी विशेष उल्लेख करत, त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेतली.
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस, किटॅक लिम यांनीही या कार्यक्रमासाठी आपला संदेश पाठवला. 'स्त्री-पुरुष समानतेसाठी एक जाळे निर्माण करणे' ही संकल्पना, सागरी क्षेत्रातील स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्यासाठी सहकार्य आणि नेटवर्किंगचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे, असे लिम यांनी आपल्या संदेशात सांगितले. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, आणि सागरी क्षेत्रात प्रस्थापित महिला संघटना यांच्यातील समन्वय याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. यातून जगभरातील सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांना पाठबळ मिळेल आणि पुढच्या पिढ्यांना सागरी उद्योगात प्रोत्साहनही मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीही सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानता महत्वाची असल्याचे लिम यांनी संगितले.
एनएमडीसी चे अध्यक्ष, राजीव जलोटा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर ‘सागरी क्षेत्रात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्ती आणि समूहांचे जाळे निर्माण करणे’ ह्या विषयावर चर्चासत्रही घेण्यात आले.

यावेळी श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सागरी क्षेत्राततल्या विविध भागात महिला म्हणून पहिल्यांदाच कार्य करण्याचा मान मिळवणाऱ्या आणि आपले विशेष उल्लेखनीय योगदान दिलेल्या सोळा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या महिलांची ओळख आणि कार्यकर्तृत्व पुढीलप्रमाणे:
- सुमतीबेन मोरारजी : सागरी क्षेत्राचा पाया रचण्यात सुमतीबेन मोरारजी यांचे महत्वाचे योगदान आहे.
- अॅना राजम मल्होत्रा : सागरी क्षेत्राचा पाया रचण्यात अॅना राजम मल्होत्रा यांचे महत्वाचे योगदान आहे.
- आशा शेठ : राष्ट्रीय सागरी वारसा संकुल समितीच्या सदस्य असलेल्या आशा शेठ भारतात जहाजबांधणी क्षेत्राचा पाया रचणाऱ्या ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीचे संस्थापक, दिवंगत वसंत शेठ यांच्या पत्नी आहेत. हा वारसा लोकांसमोर आणण्याऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
- राणी जाधव आयएएस (निवृत्त) : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. अनेक महत्वाचे निर्णय आणि धोरण आखणीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
- किरण धिंग्रा, IAS (निवृत्त) : पहिल्या महिला नौकानयन महासंचालक म्हणून किरण धिंग्रा यांनी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेत खलाशांच्या कार्याचे नेतृत्व केले आहे.
- मालिनी शंकर, आयएएस (निवृत्त), कुलगुरू, भारतीय सागरी विद्यापीठ : डॉ.मालिनी शंकर या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत ज्यांना तीन दशकांहून अधिक काळ अनुभव आहे. डॉ.शंकर सध्या भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरू असून, या विद्यापीठाच्या त्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत.
- कॅप्टन सुनेहा गडपांडे, अधीक्षक, हाफनिया : सर्व जुन्या परंपरा मोडून, कॅप्टन सुनेहा गडपांडे यांनी एमटी स्वर्ण कृष्णाच्या नेतृत्वाखाली सर्व महिला कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) मध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला नॉटिकल कॅडेट्सपैकी एक आहेत. महिला सागरी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
- दिव्या जैन, सीई, एससीआय : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एमटी स्वर्ण कृष्णा, सर्व-महिला खलाशांना घेऊन जाणारे पहिले जहाज बनले. मुख्य अभियंता दिव्या जैन, या त्या जहाजावर, सर्व-महिला सागरी अभियंत्यांच्या इंजिन संघाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला मुख्य अभियंता होत्या.
- कॅप्टन राधिका मेनन : अडकलेल्या मच्छीमारांची सुटका करतांना खोल समुद्रात शौर्य गाजवणाऱ्या , कॅप्टन राधिका मेनन सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. त्या भारताच्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून ओळखले जातात.
- सोनाली बॅनर्जी, सागरी सर्वेक्षक, IRS : मुख्य अभियंता बनलेल्या सोनाली बॅनर्जी यांना जहाजबांधणी उद्योगाचा दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्या पहिल्या महिला सागरी अभियंता आहेत.
- सुनीती बाला :सस्टेनेबिलिटीच्या प्रमुख SCI अल्बर्टा एक्का सागरी जहाजावर सेवा देणारी पहिली महिला मुख्य अभियंता आहे.
- रेश्मा निलोफर, मरीन पायलट : रेश्मा निलोफर विशालक्षी, श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट (पूर्वी कोलकाता पोर्ट ट्रस्ट) मधील सागरी पायलट आहेत. त्या भारतातील पहिल्या महिला सागरी पायलट आहेत.
- एच. के. जोशी- माजी CMD, SCI : एच. के. जोशी भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनच्या प्रमुखपदी होत्या, जेव्हा एमटी स्वर्णा कृष्णाने सर्व महिलांच्या क्रूसह अशा प्रकारचा पहिला प्रवास केला. त्या SCI च्या प्रथम महिला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहिल्या आहेत.
- पार्वती राजलक्ष्मी, नौदल वास्तुविशारद : पार्वती राजलक्ष्मी या नौदल वास्तुविशारद आहेत. त्या पहिल्या महिला नौदल वास्तुविशारद आहेत.
- रत्ना चढ्ढा, अध्यक्षा आणि संस्थापक, तिरुन ट्रॅव्हल मार्केटिंग : उद्योग क्षेत्रातील दिग्गज उद्योजक म्हणून, रत्ना चड्ढा यांनी भारतात क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन दिले. ट्रॅव्हल मार्केटिंगमधल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
- डॉ. सुजाता तोलानी-नाईक, अध्यक्षा, तोलानी बल्क कॅरिअर्स लिमिटेड आणि तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट : एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. सुजाता-तोलानी-नाईक ह्या पल्मोनरी क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आहेत, त्या तोलानी शिपिंग कंपनी लिमिटेडच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1925233)
Visitor Counter : 165